(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील मुख्य पोस्ट ऑफीससमोरील पार्किंगच्या जागेत आडोशाला संशयास्पद फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अरमान समीर अल्जी (23, अजिजा हाईट्स, कोकणनगर, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. ही घटना 17 नोव्हेंबर रोजी घडली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 200 रूपये दंड व दंड न भरल्यास 7 दिवस कारावासाची शिक्षा ठोठावल़ी. पोलिसांनी अरमान याला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 नुसार अटक केली होत़ी. रत्नागिरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा. सरकारी पक्षाकडून ऍड़ प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिल़े.
सविस्तर वृत्त असे की, रत्नागिरी शहर पोलीस पेट्रोलिंग करत असताना अरमान अल्जी हा मुख्य पोस्ट ऑफिसच्यासमोरील पार्किंगच्या जागेत बंद टपरीच्या आडोशाला संशयास्पद हालचाली करत होता. आपली ओळख पटू नये म्हणून त्याने तोंडाला रुमाल बांधला होता. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणाहून पोलिस पेट्रोलिंग करताना तो नजरेस पडला होता. त्याच्या हालचाली पाहून पोलीस त्याच्याजवळ पोहोचले. तोंडावरील रुमाल काढण्यास सांगून त्याची चौकशी केली. मात्र तो समाधानकारक उत्तरे देत नव्हता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 नुसार अटक केली होत़ी.