(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे स्वकीयांवर नाराज असून लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. अमोल कोल्हे येत्या काळात मोठा निर्णय घेऊ शकतात, असे आता ठामपणे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरासाठी अमोल कोल्हे गैरहजर राहिले, यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या एका निर्णयामुळे या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत, पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारक यादीतून अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलं आहे, यानंतर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चाही होताना दिसत आहेत.
मागच्या 3 वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघात वेळ देत नाहीत, असा आरोप होत आहे. त्यातच मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या सेलिब्रिटी असल्यामुळेही अडचण होत असल्याचं बोललं जातं. त्यामुळे अमोल कोल्हे यांना मतदारसंघात विरोधकांसोबतच पक्षातील नेत्यांकडूनही टीकेला सामोरं जावं लागतं.
अमोल कोल्हे मधल्या काळात भाजपमधील केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असल्याने त्यांच्या भाजपसोबतच्या जवळीकीला दुजोरा मिळत आहे. काहीच दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट प्रदर्शित झाला. यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते. ही भेट देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांना खुपली आहे. सध्या भाजप कार्यकर्ते मात्र अमोल कोल्हे यांचे स्वागत करायला आतुर आहेत.