(नवी दिल्ली)
लव्ह जिहादी आणि हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर व अनेकदा हत्या करण्याच्या वाढत्या घटनांना पूर्ण पायबंद घालण्यासाठी त्वरित कठोर कायदा केला जावा अशी मागणी विश्व हिंदूू परिषदेने केली आहे. श्रध्दा वालकर या तरूणीची हत्या करणा-या आफताब पूनावाला या मारेकऱ्यावर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून त्वरीत फाशी देण्यात यावी आणि ३ महिन्यांत निकाल मिळावा अशीही मागणी केली गेली आहे.
विहिंपने श्रध्दा हत्याकांड प्रकरण देशभरात तापविण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत भाजप कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी होत आहेत. ‘लव्ह जिहाद’च्या भीषण व पाशवी कारस्थानाची बळी ठरलेल्या श्रध्दा वालकर या निष्पाप तरूणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि तिच्या कुटुंबाला मानसिक आधार देण्यासाठी विहिंपने दिल्लीच्या विविध भागांत हिंदू जागरण पदयात्रा (दीप यात्रा) काढल्या.
आगामी काळातही जंतरमंतर व इतर ठिकाणी श्रध्दा हत्याकांड प्रकरणावर तीव्र आंदोलन करण्याचे विहिंपचे नियोजन आहे. आफताब याने श्रध्दाचा ज्या घरात निर्घृण खून केला व नंतर क्रूरपणाचा कळस करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते दिल्लीच्या विविध भागांत फेकले ते घर छतरपूर भागात आहे. विहिंपने या घरासमोरही यात्रा काढली होती. यात महिलाचा लक्षणीय सहभाग होता.