(मंडणगड)
मोसमी पाऊस वेळेत परतल्यामुळे यंदा कासवांच्या विणीचा हंगाम वेळेत सुरू होईल, असे चित्र दिसत आहे. वेळास (ता. मंडणगड) समुद्रकिनारी राज्यातील पहिले कासवाचे घरटे आढळून आले आहे. जिल्ह्यात सुमारे १४ किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी वनविभागाच्या सहकार्याने पावले उचलण्यात आली आहेत. गतवर्षी विणीचा हंगाम दोन पुढे गेला होता; मात्र यंदा कासव विणीसाठी वेळेत दाखल होणार असल्याने कासव मित्रही सज्ज झाले आहेत.
कोकणातील किनारी भागात ऑलिव्ह रिडले कासवं विणीसाठी येतात. अंडी घालून गेली की, त्याचे योग्यप्रकारे जतन न झाल्यामुळे त्यातून कासवांची पैदास होण्याचा टक्के अत्यल्प होता. वनविभागाच्या कांदळवन कक्षामार्फत कासव संवर्धनासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्यानुसार गेल्या काही वर्षात विणीसाठी कासव येत असलेल्या किनाऱ्यांचा शोध घेऊन स्थानिक कासव मित्रांची फौज तयार करण्यात आली आहे. मंडणगडपासून राजापूर पर्यंतच्या किनाऱ्यांवर सुमारे १४ ठिकाणी कासवांचे संवर्धन केले जाते. त्यात वेळास येथे कासव महोत्सवाचेही आयोजन केले जाते. या ठिकाणी कासवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवतात. याला पर्यटनाची जोड मिळाली आहे.
गतवर्षी मोसमी पावसाचा मुक्काम लांबला आणि प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस पडत होता. त्यामुळे कासवांचा विणीचा हंगाम पुढे गेला. नोव्हेंबर महिन्यात विणीसाठी येणारी कासवं गतवर्षी जानेवारी, फेब्रुवारीला दाखल झाली. त्यामुळे अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडण्याचा कालावधीही तेवढाच पुढे गेला. उन्हाळ्यामध्ये अंड्यांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान कासव मित्रांपुढे होते.
वनविभागाच्या मार्गदर्शनानुसार आणि तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार विविध उपाययोजना करून कासवमित्रांनी उन्हापासून अंड्यांचे संरक्षण केले. गावखडी येथे गतवर्षी सुमारे साडेचार हजार अंडी होती. त्यातील तीन हजारहून अधिक अंड्यातून पिल्ले बाहेर पडली. कासवमित्रांमुळे तिप्पट अंड्यांचे संरक्षण होऊ शकले. यंदा मोसमी पावसाने निरोप घेतला असून अवकाळीचेही संकट दिसत नाही. थंडीही पडायला लागली असून किनाऱ्यांवरील खडकाळ भागात कासवांचे दर्शन होऊ लागले आहे. हे संकेत विणीचा हंगाम जवळ आल्याचे आहेत.
वेळास येथील किनाऱ्यांवर कासवाने अंडी घातली आहेत. राज्यातील ही पहिली नोंद आहे. यावरून येत्या काही दिवसात कासवं अंडी घालण्यासाठी दाखल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कासव मित्रही सज्ज झाले आहेत. किनाऱ्यावर गस्त घातली जात असून अंड्यांच्या संरक्षणासाठी हॅचरीही उभारण्यात आली आहे.