पोलीस निरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रवीण कदम असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून धुळ्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात ते कार्यरत होते. त्यांच्या घरातून सुसाईड नोट पोलिसांनी हस्तगत केली असून त्या आधारे आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. मात्र पोलिस निरीक्षक प्रवीण कदम यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
धुळे शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असणारे प्रवीण कदम यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवीण कदम यांच्या निवासस्थानाची पाहणी केली. यावेळी त्यांना या ठिकाणी एक सुसाईड नोट मिळून आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, माझ्या आत्महत्येस मी स्वतः जबाबदार असून इतर कोणालाही दोषी धरू नये. गंगापूर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याचाही चिट्ठीत उल्लेख आहे. त्यामुळे प्रवीण कदम हे नाशिक येथील गंगापूर पोलीस ठाण्यात असताना त्यांच्यावर कुठल्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठांकडून काही दबाव होता का ? तसेच या दबावातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे का ? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.