( जाकादेवी/ वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौध्दवाडी येथे शनिवार दि. १२ रोजी रात्री बिबट्याने एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून लहानग्या तीन महिन्यांच्या पाड्यावरती हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये पाडा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्यावरती वाटद खंडाळा येथील शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी सुनिल अलकुंटे व कळझोंडीतील रविंद्र वीर यांचे उपचार सुरू होते. मात्र रविवारी रात्री उशिरा या पाड्याचा अखेर मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान कळझोंडी बौध्दवाडी येथील वयोवृद्ध शेतकरी रामचंद्र धर्मा पवार (८३) यांच्या मालकीच्या तीन महिन्यांचा पाड्याचा रविवारी रात्री मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्लाने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे अधिकारी श्री.गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बारकाईने पाहणी केली. बिबट्याचा वनविभागाने व प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.