(मुंबई / किशोर गावडे)
दापोली विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांशी जवळीक साधून शिवसेना पक्ष नेते रामदास भाईंना व मला राजकारणातून संपविण्याचा राजकीयदृष्ट्या षढयंत्र व कुंभाड रचण्यात अनिल परब व विनायक राऊत हेच कायम आघाडीवर होते. मातोश्रीचे कान भरून व उचापती करणाऱ्या टोळक्यांमुळेच 50 आमदार आणि 13 खासदार सोडून गेले अशी घणाघाती टीका आमदार योगेश कदम यांनी रविवारी मुलुंड येथे केली.
शिवसेना दापोली विधानसभा मतदारसंघातील मंडणगड, खेड व दापोली येथील मुंबईकर रहिवाशांच्या भेटीसाठी “आमदार आपल्या दारी” या कार्यक्रमांतर्गत मुलुंड पश्चिमच्या मुलुंड विद्या मंदिर येथे रविवारी सकाळी जाहीर मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ठाणे, दिवा, डोंबिवली, टिटवाळा, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर व नवी मुंबईत राहणारे हजारो शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. या जाहीर मेळाव्यात आमदार योगेश कदम मार्गदर्शन करताना बोलत होते.
ईशान्य मुंबई विभाग प्रमुख व माजी आमदार आमदार अशोक पाटील यांनी विनायक राऊत व अनिल परब हे मातोश्रीवरील दाऊद व अरब असल्याची टीकास्त्र सोडत निवडणुकीत तिकिटे व शाखाप्रमुख करण्यासाठी दिवसाढवळ्या खोके घेणारे हेच आहेत, असाही थेट हल्लाबोल पाटील यांनी यावेळी केला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, तालुकाप्रमुख उमेश राजे, तालुका संघटक प्रकाश कालेकर, बांधकाम सभापती अण्णा कदम, मुलुंड विधानसभा प्रमुख जगदीश शेट्टी, ईशान्य मुंबई महिला विभाग प्रमुख राजश्री राजन मांदविलकर, विभाग संघटक नेहा नंदकुमार पाटकर, अश्विनी बने, ज्योती तांडेल, दापोली संघटक चंद्रकांत शिगवण, मंडणगड संघटक शंकर बांद्रे, नरेश घरटकर, प्रदीप जाधव, सुधीर कदम, परशुराम सावळे, तुकाराम गायकवाड, प्रमोद चव्हाण, प्रमोद दुर्गावले, रवी कदम, विश्वास शिंदे आदी उपस्थित होते. तसेच दापोली मंडणगड खेड मुंबई कार्यकारणीचे सर्व संघटक, सचिव, संपर्कप्रमुख, उपसंघटक, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.