(मुंबई)
गाई, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी बेकायदा ऑक्सिटॉसीन औषधाची विक्री करणाऱ्या पश्चिम बंगालमधील टोळीच्या मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ठाण्यातील मुंब्रा परिसरातून अटक केली.
काही दिवसांपूर्वी पुण्यात गाई, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी बेकायदा ऑक्सिटॉसीन औषधाची विक्री होत असल्याचे उघड झाले होते. यामध्ये पश्चिम बंगालमधील टोळी सक्रिय असल्याचे पुढे आले होते. या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ठाण्यातील मुंब्रा परिसरातून अटक केली असून हा या टोळीच्या म्होरक्या आहे.
बाबूभाई उर्फ अल्लाउद्दीन लस्कर (रा. कल्याण, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या पथकाने पुण्यात ऑक्सिटॉसीन ओैषधांचा ५३ लाख ५२ हजारांचा साठा जप्त केला होता. या प्रकरणात समीर अन्वर कुरेशी (वय २९, रा. कलवड वस्ती, लोहगाव), बिश्वजित सुधांशु जाना (वय ४४, रा. पुरबा बार, विलासपुर, पुरबा मदिनीनपूर, पश्चिम बंगाल), मंगल कनललाल गिरी (वय २७, तिराईपूर, पश्चिम बंगाल), सत्यजित महेशचंद्र मोन्डल (वय २२, रा. नबासन कुस्तीया पंचायत, पश्चिम बंगाल) आणि श्रीमंता मनोरंजन हल्दर (वय ३२, रा. नलपूरकूर, मंडाल, २४ परगाना, पश्चिम बंगाल) यांना अटक करण्यात आली होती.
लोहगावमधील कलवड वस्ती परिसरात आरोपी ऑक्सिटॉसीन ओैषधाची निर्मिती करत होते. या टोळीचा मुख्य सूत्रधार बाबूभाई लस्कर पसार झाला होता. तो मुंब्रा परिसरात असल्याची महिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला मुंब्रा परिसरातील अमृतनगर येथून अटक केली.