(रत्नागिरी)
तुम्ही जीवनात कोणते क्षेत्र निवडताय, हे महत्त्वाचे नाही. तुम्ही जे कराल ते इतके उच्च दर्जाचे करा की, तुम्ही अत्युच्च ठिकाणी पोहोचाल. हा विचार मला माझ्या लहानपणी पटवर्धन हायस्कूलमध्ये गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन यांनी दिला. मी हे ध्यानात ठेवले आणि मराठी माध्यमात शिकूनही इंग्रजी शिकलो, बोलू लागलो. समाजाने हा विचार अंगिकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन डॉ. अलिमियॉं परकार यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे राष्ट्रनिर्माता पुरस्कार सन्मान (नेशन बिल्डर अॅवॉर्ड) सोहळ्यात ते बोलत होते. भारत शिक्षण मंडळाच्या आगाशे विद्यामंदिरच्या नाटेकर सभागृहात शनिवारी हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र घाग, सचिव रूपेश पेडणेकर आणि रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर नीलेश मुळ्ये, नमिता कीर आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरीची प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. श्री. घाग यांनी मनोगतामध्ये क्बलची माहिती दिली आणि पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात कॅप्टन दिलीप भाटकर (वांद्रे-वरळी सी लिंकसाठी आयआयटी पवईमार्फत नियुक्त समितीत सदस्य), सौ. प्राजक्ता कदम (ज्ञानज्योती अॅवॉर्ड), सौ. माधुरी कळंबटे (स्टार्ट अप राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त) यांनाही गौरवण्यात आले. प्रास्ताविकामध्ये विनायक हातखंबकर यांनी रोटरी क्लबने (आंतरराष्ट्रीय) केलेल्या भरीव कार्याची माहिती दिली. रत्नागिरीमध्येही ई लर्निंग सुविधा, स्वच्छतागृह, बेंचिस, बसशेड, रक्तदान शिबिरे, पोलिओ निर्मूलन आदी उपक्रमांची माहिती सांगितले. समाजाचे देणं लागतो या हेतूने रोटरी काम करत असून यात रत्नागिरीकरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. हातखंबकर यांनी केले.
याप्रसंगी डॉ. परकार यांचा सत्कार राजू घाग यांनी शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन केला. पुरस्कार विजेत्यांचा परिचय विजय पवार, सौ. कळंबटे आणि प्रमुख अतिथी डॉ. परकार यांचा परिचय मंदार सावंतदेसाई यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सारोळकर यांनी व पुरस्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी कळंबटे यांनी केले. रूपेश पेडणेकर यांनी आभार मानले. पुरस्कार प्रदान करताना सर्व विजेत्यांच्या कार्याची पीपीटी दाखवण्यात आली. रोटरी क्लबच्या वतीने जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या एनआयसीयू या रत्नागिरीकरांसाठी सर्वांत महत्त्वाच्या उपक्रमाची माहिती परेश साळवी यांनी दिली. कार्यक्रमास ज्येष्ठ सदस्य धरमसीभाई चौहान, माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, मुकेश गुप्ता, प्रताप सावंतदेसाई, अॅड. शाल्मली आंबुलकर, दादा कदम, आदी मान्यवरांसह २५० जण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी मेहनत घेतली.
पुरस्कार विजेते
संतोष गार्डी (शिक्षक, अ. के. देसाई विद्यालय), मुग्धा कुळये (मुख्याध्यापक, फणसोप मराठी शाळा), ज्योत्स्ना सागवेकर (शिक्षिका, कृ. चिं. आगाशे विद्यामंदिर), स्नेहा पाटील (मुख्याध्यापक, केळये हायस्कूल), समीना काझी (विशेष शिक्षक, सविता कामत विद्यामंदिर), गजानन रजपूत (मुख्याध्यापक, के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय रत्नागिरी), शोभना कांबळे (पत्रकार), दीप्ती कानविंदे (सांस्कृतिक व सामाजिक विभाग), महेश मिलके (जलतरण), पंकज चवंडे (खो-खो राष्ट्रीय प्रशिक्षक), धीरज पाटकर (जिद्दी माउंटेनिअर्स व सायकलपट्टू), माधुरी सावंत (बचत गट आणि सामाजिक कार्य), सरोज सावंत (बॅडमिंटन प्रशिक्षक) आणि डॉ. दिलीप नागवेकर (कृषी क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती)