( मंडणगड / प्रतिनिधी)
मंडणगड येथे एस. एम. ग्लोबल कंपनीच्या नावे मोठ मोठी आमिषे दाखवून साखळी नेटवर्कच्या नावाखाली गुंतवणूकदरांची 76 लाख 15 हजार 815 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. या प्रकरणात 11 जणांवर भादविकलम 420, 434, 409 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडणगडमध्ये एस एम ग्लोबल नावाची कंपनी असून पैशांची गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळी आमिषे या कंपनीकडून गुंतवणूकदारांना दाखवण्यात आली. अनेकांनी यामध्ये पैसे गुंतवले. मात्र कंपनीकडून आपल्याला रक्कम मिळत नसल्याचे पाहून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस स्थानकात तक्रारी देण्यात आल्या. या कंपनीबाबत मंडणगड, खेड, दापोली पोलीस स्थानकात अनेक तक्रारी पोलिस स्थानकात करण्यात आल्या आहेत. यामध्ये 76 लाख 15 हजार 715 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणातील एकूण 11 जणांवर गुन्हे दाखल करुन ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतचा अधिक तपास मंडणगड पोलीस निरीक्षक शैलजा सावंत करत आहेत.
फसवणूक झालेल्यांनी पोलीस स्थानकात तक्रार द्यावी : पोलीस अधीक्षक
एस. एम. ग्लोबल या कंपनीमध्ये ज्यांनी ज्यांनी पैसे गुंतवले आहेत. आणि ज्यांची फसवणूक झाली आहे अशा गुंतवणूकदारांनी मंडणगड पोलीस स्थानकात संपर्प साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.