( संगमेश्वर / प्रतिनिधी )
चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी आपल्या मतदारसंघात विविध विकास कामांचा धडाका लावला आहे. यामुळे आमदार शेखर निकम यांची सर्वसामान्यांचा आमदार अशी ओळख निर्माण झाली आहे. नुकतेच आमदार शेखर निकम यांनी देवरूख मुरादपुर रस्ता डांबरीकरणासाठी 2 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर केला आहे. आणि लवकरच या रस्त्याचे डांबरीकरण ही होणार आहे. खाचखलग्यातून होणारा प्रवास आता थांबणार असल्याने मतदार संघातील जनता आमदारांवर खूष आहे.
स्वयंभू श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. या मार्गावरील मुरादपूर ते निवेखुर्द या रस्त्याची तर पुर्णपणे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनचालक व भाविकांमधून वारंवार करण्यात येत होती. अखेर या रस्त्याच्या डांबरीकरण कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. यासाठी चिपळुण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून नाबार्ड अंतर्गत २ कोटी ४० लाख एवढा भरीव निधी मंजूर झाला आहे.
देवरूखपासून सुमारे १८ किमी अंतरावर सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी एका गुहेमध्ये स्वयंभू मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. हे देवस्थान निसर्गरम्य ठिकाणी वसलेले असल्यामुळे मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी व येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दरदिवशी हजारो भाविक मार्लेश्वर तीर्थक्षेत्री येत असतात. हे भाविक मार्लेश्वराचे दर्शन घेवून धन्य होतात. मात्र सध्यस्थितीला मार्लेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून जागोजागी डांबरीकरण उखडले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे भाविकांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत.
या खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालवताना वाहचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर खड्ड्यातून वाहन गेल्यास हादरा बसून कंबरदुखी, मणकादुखी, पाठदुखीची समस्या उद्भवत असल्याचे वाहनचालकांमधून बोलले जात आहे. तर छोट्या वाहनांचे पार्ट्स ढिले होत असल्याचेही दुचाकीस्वार सांगत आहेत. त्यामुळे या त्रासातून मुक्तता मिळण्याकरीता या रस्त्याचे डांबरीकरण त्वरीत करण्यात यावे, अशी वाहचालकांची मागणी होती. अखेर याला यश येताना दिसत असून लवकरच मुरादपूर ते निवेखुर्द या रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरूवात होणार आहे. यासाठी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून नाबार्ड अंतर्गत २ कोटी ४० लाख इतका भरीव निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरण कामाला येत्या चार दिवसात सुरूवात होईल, अशी माहिती बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नितीन भोसले, मंगेश बांडागळे, हुसेन बोबडे यांनी दिली आहे.