( खेड / प्रतिनिधी )
खेड येथे शेजार्यानेच एका महिलेचा 75 हजार रुपयांची फसवणूक केली आणि वरती तिलाच शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनुस इब्राहीम परकार (शिवाजीनगर, महाडनाका, खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद खैरुनिसा इम्रान कादिरी (36, महाडनाका हमदुले चाळ, खेड) यांनी खेड पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खैरुनिसा कादिरी आणि संशयित आरोपी युनुस परकार हे एकमेकांच्या शेजारी राहतात. खैरुनिसा यांचे पती परदेशात असल्याने त्यांनी पत्नीला काही रक्कम पाठवली होती. शेजारी राहणार्या युनुस इब्राहीम परकार याने खैरुनिसा यांचा विश्वास संपादन केला होता. पतीने पाठवलेल्या पैशातून थकीत एलआयसी पॉलिसीची पैसे खैरुनिसा यांना भरायचे होते. त्यांनी 8 मार्च 2018 ते 10 डिसेंबर 2019 या वर्षभराच्या मुदतीचे 25 हजार रुपयांचे 3 चेक युनुस याच्याकडे दिले. एलआयसी पॉलिसीचा हप्ता भरण्यासाठी पॉलिसी नंबरही दिला. मात्र युनुस याने ते पैसे पॉलिसीमध्ये न भरता स्वतःच्या नावे असलेल्या बँक ऑफ बडोदा बँकेत जमा केले. खैरुनिसा यांनी युनुसकडे पैशाची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि शिवीगाळ करत दमदाटी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खैरुनिसा यांनी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी युनुस परकार याच्यावर भादविकलम 406, 420, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.