लागोपाठ दुसऱ्या वर्षी ऐन हंगामात आलेल्या भीषण चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि लगतच्या जिल्ह्यांतील आंबा बागायतदारांचे कंबरडे पुरते मोडले असून आंबा बागायतदार व वादळग्रस्तांना शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी मदत व पुनवर्सन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
कोकणातील हंगामी उत्पन्नाचे सर्व मार्ग तौक्ते चक्रीवादळाने धुवून टाकले असून कोकणी अर्थव्यवस्थेस यापूर्वी कधीही नव्हता एवढा जबर फटका बसला आहे. कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातही आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीने मदतीची व्यवस्था करावी अशी मागणीही श्री. यादव यांनी केली आहे.
गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाने पुरता उद्ध्वस्त झालेला कोकणातील शेतकरी राज्य सरकारने तेव्हा जाहीर केलेल्या मदतीपासून अजूनही वंचितच असताना यंदा तौक्ते वादळाने नवा जबर फटका दिल्याने आंबा उत्पादक, शेतकऱ्यास सावरणे अशक्य झाले आहे. उद्ध्वस्त कोकणास पुन्हा उभे करण्यासाठी आता त्याला थेट मदत मिळाली पाहिजे. राज्य सरकारने तातडीने मदतीचे वाटप करून आंबा उत्पादक शेतकऱ्यास दिलासा दिला पाहिजे, असे श्री. यादव यांनी म्हटले आहे.
तौक्ते वादळामुळे झालेल्या हानीमुळे किमान पाच वर्षे शेतकऱ्यास डोके वर काढता येणार नाही. पिकांबरोबरच मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले असून असंख्य घरेदारे, गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे गेल्या वर्षीपासूनची कोरोनामुळे टाळेबंदी आणि वादळाचा तडाखा अशा दुहेरी संकटात त्याला हात देण्यासाठी सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणीही प्रशांत यादव यांनी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास कर्जावरील व्याजमाफी, वीजबिल माफी आणि कर्जफेडीस मुदतवाढ मिळाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.