(मुंबई)
गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था ‘महाराष्ट्र पक्षीमित्र’ तर्फे देण्यात येणाऱ्या २०२२ च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार सोलापूर येथील भीमाशंकर कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला. पक्षी संशोधन पुरस्कार नांदेड येथील प्रा. डॉ. जयवर्धन बलखंडे यांना, पक्षी संवर्धन व सुश्रूषा पुरस्कार सोलापूर येथील राजकुमार कोळी यांना तर पक्षी जनजागृती पुरस्कार गडहिंग्लज येथील अनंत पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे.
पक्षी सबंधित विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र पक्षीमित्रतर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली असून यामध्ये दरवर्षी चार पुरस्कार देण्यात येतात. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र पक्षीमित्र तर्फे अमरावती येथे संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी केली.
रमेश लाडखेडकर स्मृती पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार हा दीर्घकाळ पक्षीमित्र चळवळीत राहून, पक्षी संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत पक्षिमित्र, चळवळीतील मार्गदर्शक, जेष्ठ सभासद, तसेच पक्षीविषयक पुस्तकांचे लेखक, माळढोक पक्ष्याचे अभ्यासक कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. जी. एन. स्मृती पक्षी संशोधन पुरस्कार हा पक्षीमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, संशोधन, प्रकाशने आणि त्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी प्रा. डॉ. बलखंडे यांना जाहीर करण्यात आला. पक्षीमित्र पक्षी संवर्धन व सुश्रुषा हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीतील पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन तथा जखमी पक्षी उपचार आदी क्षेत्रात कार्यरत असलेले कोळी यांना जाहीर करण्यात आला आहे. रामभाऊ शिरोडे ( वाणी) स्मृती पक्षीमित्र पक्षी जनजागृती पुरस्कार हा पक्षीमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास आणि जनजागृती आणि पक्षी निवडणुकीच्या माध्यमातून पक्षीविषयक जनजागृती करणारे पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. फेब्रुवारीमध्ये चंद्रपूरमध्ये होणाऱ्या ३५व्या पक्षीमित्र संमेलनात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.