( मुंबई )
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे रिक्षा व डंपर यांच्या झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील एकूण ४ व्यक्तींचा मृत्यू झाला. हालीमा अब्दुल सलाम पोपेरे, (23 वर्षे, नांदवी), आसिया सिद्दीक (20 वर्षे, गोरेगाव), नाजमीन मूफीद करबेलकर (22 वर्षे, सवाद) अमन उमर बहुर (46 वर्षे, गोरेगाव) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या मृत्यांच्या वारसांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याजवळ कशेडी घाटामध्ये काल रिक्षा व डंपरचा भीषण अपघात झाला. अपघातात एकूण ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये तीन मुलींचा समावेश होता. पोलादपूर खेड येथून माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे परतत असताना रिक्षाचा अपघात झाला. खेड येथे परीक्षेसाठी जात असलेल्या गोरेगाव येथील विद्यार्थ्यांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात तीन मुली आणि एक रिक्षाचालक ठार झाला. वाळूने भरलेला डंपर या रिक्षावर पलटी झाल्यामुळे हा अपघात झाला होता. अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली.