( गुहागर / प्रतिनिधी )
तालुक्यातील वेलदूर येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रतिक्षा कुशा तांडेल (23, रा. वेलदूर खारवीवाडी ) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ही घटना रविवारी 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, प्रतिक्षा ही वेलदूर खारवीवाडी येथे मामाच्या शेजारी भाडयाची खोली घेवून रहात होती. ती एका ग्रामपंचायतीमध्ये डाटा ऑपरेटर म्हणून काम करत होती. प्रतिक्षा हेच पदवी पर्यंत शिक्षण झाले आहे. तर प्रतिक्षाच्या भावाचे सिव्हील इंजिनिअरींग पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. रविवारी 6 नोव्हेंबर रोजी दुपारी आपल्या खोलीवर आल्यावर खोलीचे दरवाजे व खिडक्या बंद करुन ठेवल्या होत्या. सायंकाळी देखील प्रतिक्षाने दरवाजे खिडक्या उघडल्या नाहीत म्हणून शेजारी रहाणाऱ्या नंदीनी जांभारकर यांनी प्रतिक्षाला हाका मारल्या. मात्र खोलीतून प्रत्युत्तर न आल्याने त्यांनी ग्रामस्थांना बोलावले. दरवाजे खिडक्या ठोठावल्या परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी दरवाजा जोरात ढकलुन उघडला. त्यावेळी खोलीतील लोखंडी वाश्याला जरीकाटच्या साडीने गळफास लावलेल्या स्थितीत प्रतिक्षा दिसून आली. ग्रामस्थांनी लगेचच तिला खाली उतरवले. मात्र प्रतिक्षा हीचा मृत्यू झाला होता. आत्महत्येपूर्वी प्रतीक्षाने एक चिठ्ठी लिहिली होती. ही चिठ्ठी पोलिसाना सापडली आहे. यामध्ये तिने म्हटले आहे की, आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे. कोणाला दोषी धरू नये. पोलिसांनी अधिक चौकशी व तपासणी केली असता 5 दिवसांपूर्वी प्रतिक्षा डॉक्टरांकडे जावून आल्याचे कळले. तसेच खोलीत सुमारे 9 हजार रुपयांची औषधे खरेदी केल्याचा कागदही सापडला. तिच्या पश्चात आई व भाऊ असे कुटुंब आहे.