( बंगळूरू )
कुठल्याही परवानगी शिवाय के. जी. एफ. २ चित्रपटातील गाण्यांचा वापर केल्याप्रकरणी बंगळुरूच्या न्यायालयाने सोमवारी काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल अकाऊंट तात्पुरते ब्लॉक करण्याचे निर्देश दिले. एमआरटी म्युझिक कंपनीने काँग्रेसविरोधात कॉपीराइट केस दाखल केली होती.
काँग्रेस विरोधात एमआरटी म्युझिक कंपनीने कॉपीराइट कायद्याच्या उल्लंघनाची तक्रार दाखल केली होती. कॉँग्रेसने परवानगीशिवाय या चित्रपटातील गाण्यांचे व्हिडिओ शेअर केला. त्यामुळे हा प्रकार बेकायदेशीर आणि अधिकारांची अवहेलना करणारा आहे. त्यामुळेच पायरसीला प्रोत्साहन मिळते, असे म्युझिक कंपनीचे म्हणणे आहे. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने या दोन्ही ट्विटर हँडलवरून तीन लिंक काढून टाकण्याचे निर्देश कॉँग्रेसला दिले.
एमआरटी म्युझिकने काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनाते यांच्याविरोधात यशवंतपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. म्युझिक कंपनीने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, केजीएफ-2 गाण्याचे हिंदीतील हक्क मिळवण्यासाठी आम्ही खूप पैसे मोजले आहेत. काँग्रेस पक्षाने केलेले हे कृत्य बेकायदेशीर असून व्यक्ती आणि संस्थांच्या अधिकारांची अवहेलना करणारे आहे.