(संगमेश्वर)
देवरूखातील महालक्ष्मी एजन्सीमधून संगमेश्वर तालुक्यात गॅसचे वितरण करण्यात येते. शनिवार 5 नोव्हेंबर रोजी फणसवणे येथे घरगुती गॅसचे वितरण करण्यासाठी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांना सिलेंडरमधील गॅसची चोरी करताना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. ग्रामस्थांनी याची माहिती देवरूख तहसीलदार यांना कळवली होती. एजन्सीवर कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली होती. त्यानंतर पुरवठा विभागाने एजन्सीची गाडी आणि गॅसची चोरी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. तहसीलदारांनी घटनेचं गांभीर्य ओळखून या घटनेचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. वरिष्ठांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त असे की, शनिवार 5 नोव्हेंबर रोजी दु. 3.30 वा. च्या सुमारास देवरुखातील महालक्ष्मी एजन्सीजची बोलेरो (एमएच 08, डब्लयू 5609) गॅस सिलेंडरचा वितरणासाठी फणसवणे येथे गेली होती. रेशनिंग दुकानासमोर उभी असताना गाडीतून गॅस लिकेज होत असताना आवाज येत होता. शिवाय गॅसचा वासही येत होता. यावेळी येथील तरुणांना गॅसची चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बोलेरो चालकाला पकडले. यावेळी सिलेंडमध्ये पाईप टाकून दुसरा सिलेंडर वरती ठेवून रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जात होता. ग्रामस्थांनी ही बातमी देवरुख तहसीलदार थोरात यांना कळवली. थोरात यांनी नायब तहसीलदार पंडित यांना पाठवून गाडी ताब्यात घेण्यास सांगितले. त्यानंतर गाडी देवरुख पुरवठा विभागात ठेवण्यात आली आहे.
तहसीलदारानी गॅस वितरणात होत असलेली दिरंगाई, चोरी आणि संबंधित एजन्सी विरोधात नागरिकांच्या वाढत्या तक्रारी याची दखल घेत, तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. या एजन्सीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी वरिष्ठांकडे केली आहे. कारवाई संदर्भात वरिष्ठांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महालक्ष्मी एजन्सीवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.