(मुंबई)
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सभा रद्द झाल्या आहेत. आदित्य ठाकरे यांची सभा औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे होणार होती, तर सुषमा अंधारे यांची सभा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे होणार होती. या दोन्ही सभा रद्द करण्यात आल्या आहेत.
शिंदे गटाने जाणीवपूर्वक पर्यायी सभा घेण्याचे नियोजन करून अडवणूक करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी केलेल्या मैदानाची मागणी नाकारून दुसरे मैदान देत अडवणूक केली. त्यामुळे आदित्य ठाकरे सिल्लोड दौऱ्यात शेतक-यांशी संवाद साधणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे सुषमा अंधारेंची सभा होती, तर याच ठिकाणी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सभा होती. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करत या दोन्ही सभांना परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आम्ही सभा रद्द करत असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. दरम्यान, सुषमा अंधारेंच्या सभेला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आता सुषमा अंधारे यांचीही सभा रद्द झाल्याने त्याही रात्री पुण्याकडे रवाना झाल्या.
पोलिसांना ग्रामीण भागात सभेमुळे वातावरण बिघडेल असे वाटत असेल तर त्यासाठी पोलिसांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पण ते त्यांच्याकडून होत नसेल तर गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी ठरत आहेत. त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही, अशा शब्दांत अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.