( पंढरपूर )
कार्तिकी एकादशीला गालबोट लावणारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला पायी जाणत्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. दिंडीत कार घुसल्याने 8 वारकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे की, कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूर जठारवाडी येथून पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत मागून कार घुसली. ही कार वारकऱ्यांना चिरडत पुढे जाऊन थांबली. यात 8 वारकऱ्यांचा मृत्यू झाला. सारे वारकरी विठुरायाचे नामस्मरण करत असताना अचानक कार धुसली आणि प्रत्येकाला चिरडत पुढे गेली. या दिंडीमध्ये 32 वारकरी होते. यातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
सोमवार 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता ही दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रस्त्याजवळ ही घटना घडली. ही कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असल्याचे समजत असून यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात जखमी झालेल्या सहा वारकऱ्यांवर सांगोला येथे उपचार सुरु असून आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.