(मुंबई)
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना 3 महिन्यापूर्वी घडली होती. त्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षा संदर्भात शिवसेनेचं चिन्ह आणि खरी शिवसेना कोणाची याची सुनावणी आज होणार आहे.
सुप्रीम कोर्टात आज पहिल्या क्रमांकावरच महाराष्ट्राचे प्रकरण असणार आहे. न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ महाराष्ट्राच्या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आजपासून पुन्हा मूळ मुद्द्यांवर युक्तिवाद होणार आहे. शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याबाबत निवडणूक आयोगाने जी कारवाई केली त्याचाही उल्लेख आजच्या सुनावणीत होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
या पूर्वी 27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या आल्या. नवरात्रीची नऊ दिवसांची सुट्टी आणि त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज पुढे जाणार हे स्पष्ट होतं. त्यामुळे पुढील सुनावणीसाठी 1 नोव्हेंबरची तारीख देण्यात आली होती.
राज्यातील सत्तासंघर्षाचा प्रश्न हा 21 आणि 22 जून रोजी सुरु झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं. आतापर्यंत तीन बेंचकडे हे प्रकरण गेलं. सुरुवातीला व्हेकेशन बेंचसमोर याची सुनावणी झाली. त्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या बेंचकडे यावर सुनावणी सुरू झाली. त्यानंतर यावर पाच न्यायाधीशांचे एक घटनापीठ तयार करण्यात आलं.