( रत्नागिरी / जगदीश कदम )
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील डॅफोडिल हाइट्स गृहनिर्माण सोसायटीतील बच्चे मंडळींनी लोहगड या किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. वीस फूट लांब व सहा फूट उंच अशा भव्य आकारमानात हा किल्ला साकारला आहे. हा किल्ला संपूर्ण साळवी स्टॉप परिसरात लक्षवेधी ठरला आहे.
शिवकालीन पराक्रमी इतिहास पुढच्या पिढीला माहीत व्हावा या मुख्य हेतू आणि उद्देशाने डॅफोडिल हाइट्स गृहनिर्माण संस्थेच्या बच्चे मंडळींनी हा किल्ला साकारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा नव्या पिढीला कळण्यासाठी येथील लहान मुलांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार हा किल्ला बनवला आहे. यासाठी सोसायटीच्या सर्व मुलांनी सलग पंधरा दिवस अथक मेहनत घेतली. दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुलांनी हा आनंद उपभोगला. लोहगड या किल्ल्याची प्रतिकृती तयार करताना किल्ल्याची मजबूत तटबंदी हुबेहूब साकारण्यात आली आहे. तोफखाना, किल्ल्यातील विहिर, किल्ल्यातील शिवरायांचे आसनस्थान, शिक्षेसाठी असलेले टकमक टोक या वैशिष्ट्यांनी हा किल्ला डोळ्यांचे पारणे फेडत आहे. आपल्या कलागुणांना वाव मिळावा या भूमिकेतून हा किल्ला मुलांनी साकारला आहे. डॅफोडील हाइट्स गृहनिर्माण संस्था या संस्थेतील लहान मुलांमध्ये एकजुटीची भावना यातून निर्माण होऊन दुर्लक्षित ऐतिहासिक गडकिल्ले सर्वांपर्यंत पोहोचाव्यात आणि आताच्या पिढीने त्या जतन करून ठेवाव्यात या भूमिकेतून हा किल्ला साकारला गेला आहे.
लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा पासून जवळ सह्याद्रीच्या कडेकपारीत मावळ प्रांतात आहे. या किल्ल्याचे विशेष महत्व समजून, भारत सरकारने सुद्धा या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या लोहगड किल्लाची प्रतिकृती साकारण्यासाठी डॅफोडील हाइट्स गृहनिर्माण सोसायटीतील शिवम ठसाळे, यश राऊत, श्रीपाद जाधव, सरोज चव्हाण, आयुष खरवतेकर, वेदांत कुबडे, आराध्य शारंगधर, सार्थक जगताप, श्रवण पाटील, सारंग कुळ्ये, साकार आंबुरे, साई तोडकर, समर्थ कांबळे आदी मुलांनी मेहनत घेतली आहे. त्यांच्या या मेहनतीचे समाजाच्या सर्वच स्तरातून आणि विशेषतः किल्लाप्रेमी नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.