( चिपळूण / प्रतिनिधी )
जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र चालूच आहे. पोलिसाना चोरांवर अंकुश ठेवण्यात यश आलेलं नाही. वाढत्या घटनानी नागरिकही भयभीत झाले आहेत. चिपळुणात नातेवाईकांनीच घरफोडी केल्याचा प्रकार पुढे आला आहे. शहरातील कोहिनूर प्लाझा येथील सदनिका फोडून ३ लाख रुपये किमतीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना मे ते ऑक्टोबरच्या कालावधीत घडली आहे. याबाबतची तक्रार जुबेदा हमीद तांबे (रा.मालदोली मोहल्ला) यांनी पोलिस स्थानकात दिली. त्यानुसार पोलिसांनी मुलगी व जावयावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जावई रहिमतुल्ला युसूफ खोत व मुलगी वहिदा रहमतुल्ला खोत (दोघे रा. पेठमाप, चिपळूण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेदा तांबे यांची शहरातील कोहिनूर प्लाझा येथे फ्लॅट आहे. २३ मे ते २० ऑक्टोबर या कालावधीत जावई रहिमतुल्ला खोत व मुलगी वहिदा खोत यांनी सदनिका फोडून कपाटात ठेवलेले दागिने काही रक्कम चोरून नेली. यामध्ये सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, चेन, कडा, हार असे एकूण 3 लाख 5 हजार 139 रूपये किमतीचे दागिने चोरले. तसेच रोख 25 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 30 हजार 139 रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.