( रत्नागिरी / प्रतिनिधी )
हॉटेलच्या नावाचा वापर करुन ईमेल आयडी तयार करुन रुम बुकींगच्या नावाखाली 29 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना हॉटेल ग्रिनलिफ द रिसॉर्ट गणपतीपुळे येथे घडली. याबाबतची फिर्याद हॉटेलमधील कामगार पंकज नेमाडे (25, हॉटेल ग्रिनलिफ, गणपतीपुळे, मूळ जळगाव) याने जयगड पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपतीपुळे येथील ग्रिनलिफ हॉटेलच्या नावाने अज्ञाताने गुगल मॅप या सर्च इंजिनवरील बिझनेस लिस्टमध्ये पोफाईल व्यवस्थापनासाठी मेसेज पाठवला. मेसेज ऍक्सेप्ट होताच अज्ञाताने हॉटेलमधील गुगल मॅप सर्च इंजिनवरील बिझनेस लिस्टमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवला. त्यानंतर अज्ञाताने हॉटलेचा संपर्क क्रमांक बदलून आपल्या मोबाईल नंबर टाकला. तसेच ईमेल ऍड्रेसही बदलून स्वतचा ईमेल ऍड्रेस अपलोड केला. यानंतर अज्ञाताने हे हॉटेल आपलेच असल्याचे भासवून हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना रुम बुक करण्यासाठी ऑनलाईन पैसे स्वीकारले. असे एकूण 29 हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले. ग्राहकांनी त्या ठिकाणी येवून रुमची चौकशी केली असता इथे बुकींग न झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पंकज नेमाडे यांनी ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबरची खात्री केली असता दोन्ही ही बदललेले दिसून आले. ग्राहकांची आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नेमाडे यांनी जयगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी अज्ञातावर भादंविकलम 419, 420 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 43 (फ), 66 (क), 66 (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी करत आहेत.