(रत्नागिरी)
भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखा रत्नागिरी यांचे विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामधील वणंद येथे माता रमाई राष्ट्रीय स्मारक याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या निवासी बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराला मंगळवार २५ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला. या शिबिरात भिक्षु संघाचे अध्यक्ष तथा चैत्यभूमीचे व्यवस्थापक पूज्य भंते बी संघपाल महाथेरो हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिले असून, त्यांचे मौलिक मार्गदर्शन शिबिरार्थी लाभणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन रत्नागिरी दापोलीतील माता रमाई राष्ट्रीय स्मारक वणंद येथे प्रमुख मार्गदर्शकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी हा उद्घाटन कार्यक्रम आणि संपूर्ण शिबिर भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष अनंत सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली घेण्यात येत असून या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक संस्कार विभागाचे सचिव प्रा. अल्पेश सकपाळ, जिल्हा कार्यालययीन सचिव प्रदीप जाधव, आदींसह दापोली तालुका शाखेचे अध्यक्ष संदीप धोंत्रे, शाखेचे दीपक धोंत्रे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरात एकूण २७ शिबिरार्थी सहभागी झाले असून या सर्व शिबिरार्थींना बौद्ध धम्मातील गाथा व धार्मिक विधीसंदर्भात अतिशय मौलिक मार्गदर्शन पूज्य भंते बी संघपाल यांचेमार्फत लाभणार आहे. सदर शिबिर मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर ते सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर या दहा दिवशीय कालावधीत निवासी स्वरूपात घेण्यात येणार असून या शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींची लेखी परीक्षा घेऊन संबंधित शिबिरार्थीना बौद्धाचार्य सनदकार्ड व प्रमाणपत्र वितरित केली जाणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा शाखा भारतीय बौद्ध महासभेच्या आयोजकांकडून देण्यात आली. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष अनंत सावंत यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी पदाधिकारी आणि बौद्धाचार्य, श्रामणेर मेहनत घेत आहेत.