(देवरूख / सुरेश सप्रे)
महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित व विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांचे आंदोलन, शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर खाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू आहे. हे आंदोलन निव्वळ नैसर्गिक टप्पा वाढीने पगार द्या व त्रुटीपात्र प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना नैसर्गिक टप्पा वाढीने अनुदान सूत्र चालू करा यासाठी सुरू आहे. इतके दिवस आंदोलन सुरु असून याकडे शासनाकडून व विशेषतः शिक्षक आमदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. ज्या शिक्षकांना आमदार केले त्या शिक्षक आमदारांना शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात रस दिसत नसल्याने त्यांचेविषयी प्रचंड नाराजीचा सुरू पाहायला मिळत आहे. तर नजीक आलेल्या शिक्षक आमदारकीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, शिक्षकांचे प्रश्न जाणीवपूर्वक शिक्षक आमदारांकडून लांबवले जात असल्याचा थेट आरोप प्रा. दिपक कुलकर्णी यांनी केला.
शिक्षक आमदार, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांना नैसर्गिक टप्पा वाढीने अनुदान द्या असा मुद्दाच मांडत नसल्याने, शिक्षकांकडून, शिक्षक आमदारांच्या कारभारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षक आमदार दुय्यय विषय समोर घेऊन खूप मोठा पराक्रम केल्याचे चित्र निर्माण करत असल्याचा आरोप केला जात आहे.
आझाद मैदानावरील आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावरील शिक्षकांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी “वर्षा” वर पाचारण केले होते. चर्चा सकारात्मक होऊन शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, पैशांची अडचण समोर आणणार नाही असे आश्वासित केले. नैसर्गिक टप्पा वाढीने अनुदान देण्यासाठी लवकरच बैठक घेऊन माहिती घेतो व हा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती शिक्षक समन्वयक प्रा दीपक कुलकर्णी यांनी दिली.
शिक्षकांचे गंभीर प्रश्न, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना सोडवण्यापेक्षा, चिघळवण्यात जास्त रस दिसत असल्याचा आरोप शिक्षक नेते दिपक कुलकर्णी यांनी केला आहे. शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदान, मुंबई येथे १० ऑक्टोबर पासून १९ सप्टेंबर २०१६ चा शासन निर्णय रद्द करून विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १५ नोव्हेंबर २०११ व ४ जून २०१४ या शासन निर्णय अन्वये अनुदानाचे सूत्र लागू करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
“माझा पगार, माझी जबाबदारी” त्यासाठी “शेवटची मुंबई वारी” या भूमिकेखालील राज्यातील शिक्षक मुंबई या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. मात्र अद्यापही या शिक्षकांच्या मागणींवर सकारात्मक असा कोणताही तोडगा न निघाल्यामुळे या शिक्षकांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. शिक्षकांनी आझाद मैदानातच आपली काळी दिवाळी साजरी केली. आंदोलक शिक्षकांनी शिक्षकांचे वर्षानुवर्ष प्रश्न प्रलंबित असण्यासाठी शिक्षक आमदार जबाबदार आहेत, वेळोवेळी ज्या त्या समस्या कोणत्याही शासनाची जी चुकीची जी धोरण होती त्याला शिक्षक आमदारांनी कठोर विरोध केला असता तर शिक्षकांच्या नशिबी विनाअनुदानाचे जगणे आलेच नसते, काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ पडलीच नसती. मात्र सोयीच्या राजकारणासाठी हे मुद्दे लांबविण्यात आले असा आरोप दिपक कुलकर्णी यांचेसह इतर आंदोलकांनी केलेला आहे. आज रोजी या शिक्षकांचे वय सेवेच्या आयुष्य सेवानिवृत्तीकडे निघून गेलेले आहेत, अनेक शिक्षकांच्या खिशामध्ये दमडी नाही. प्रपंच चालवत असताना खूप मोठे तारेवरची कसरत होत आहेत. मात्र प्रश्न हा जसाचा तसा कायम आहे.
मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शिक्षक आमदार शिक्षक समन्वय संघाचे प्रतिनिधी, त्यासोबत राज्याचे शिक्षक पदवीधर आमदार , शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये १ नोव्हेंबर २०२२ रोजी बैठक पार पडणार आहे.या बैठकीमध्ये १५ नोव्हेंबर २०११ व ४ जून २०१४ या शासन निर्णयाचे अनुदान सूत्र लागू करण्यात यावे ही आग्रहाची मागणी शिक्षक समन्वय संघाने केलेली आहे. याकरिता बैठकीला जाण्याअगोदर आझाद मैदानात सर्व शिक्षक आमदारांनी एकत्र येऊन समन्वय संघाची भूमिका समजून घ्यावी, अशी भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आली.