( मुंबई )
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना कोणाला भेटत नव्हते, कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेत नव्हते. मात्र सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेची खदखद बाहेर काढली. त्यानंतर भाजप – शिंदे सरकार स्थापन झाले. या नाट्यनंतर उद्धव ठाकरे पुरते घाबरले आहेत. कार्यकर्त्यांना भेटी नाकारणारे उद्धव ठाकरे आता मांडीला मांडी लावून बसत आहेत. सेल्फी काढत आहेत. लोकांच्यात मिसळत आहेत. यावरून विरोधकांना कोलीत मिळालं आहे.
मुख्यमंत्री असताना घराबाहेर न पडलेले मुख्यमंत्री आता घराबाहेर पडून शेतकऱ्याच्या बांधावर जात आहे. नुकताच त्यांनी औरंगाबाद येथे दौरा केला. शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. 15-20 मिनिटात तिथून निघाले. त्यानंतर विरोधकांनी जोरदार टोला लगावला शिंदे गटाचे नेते ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ट्वीटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. आजारपणातून बरे होत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून सरकारला मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
यावर टीका करताना म्हस्के म्हणाले, शिंदे साहेबांना डॉक्टरच म्हटले पाहिजे. त्यांच्या धाकाने का होईना, उद्धव ठाकरे बांद्रयाच्या, मुंबईच्या बाहेर पडले. शिंदे साहेबांच्या सुसाट कामाची मात्रा लागू पडली म्हणायच. बाकी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्वतःसह महाराष्ट्रालाच आजारी करून ठेवलं होतं ,अशा खरमरीत शब्दात टीका केली आहे.
औरंगाबाद दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, ‘मला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवलं हरकत नाही. माझ्याशी आणि शिवसेनेची गद्दारी केली पण निदान बळीराजाची गद्दारी करू नका, शेतकऱ्यांसोबत गद्दारी करणारे सरकार आहे. शेतकरी संकटामध्ये सापडला आहे. तो तुम्हाला दिसत नाही. तुम्ही फक्त घर घर फिरत आहात, शेतकऱ्यांकडे लक्ष द्या; अशी टीका ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. त्यांच्या टिकेनंतर राज्यात शिंदे समर्थक आणि भाजपाच्या काही लोकांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कसे वागत होते आणि आता कसे वागतहेत हे साऱ्या जनतेला दिसत आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.