(नवी दिल्ली)
पुढील वर्षापर्यंत जगभरात सर्वांनाच मंदीचा सामना करावा लागणार असे बोलले जात आहे. मंदीच्या नावाखाली अमेरिकेसह अनेक देशांमधील कंपन्यांनी आपल्या काही कर्मचा-यांची सेवा समाप्ती केली आहे. यामध्ये आता आणखी एका दिग्गज कंपनीचे नाव जोडले जाणार आहे. त्यामध्ये “फिलिप्स”चा समावेश आहे. आयटी क्षेत्राला मंदीचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी फिलिप्सने नोक-या कपातीची घोषणा केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले की, उत्पादकता सुधारण्यासाठी आणि तरलता वाढविण्यासाठी ४ हजार नोक-या कमी करण्यात येणार आहेत. ऑपरेशनल आणि पुरवठा आव्हानांमुळे तिस-या तिमाहीतील विक्रीवर परिणाम झाल्याचे फिलिप्सने एका निवेदनात म्हटले. अशा परिस्थितीत दिवाळीच्या काळात कंपनीचा हा निर्णय हजारो कर्मचा-यांसाठी धक्कादायक आहे. समुहाची विक्री ४.३ अब्ज युरो राहिली असून विक्रीत ५ टक्क्यांनी घट झाली आहे. हा आकडा १२ ऑक्टोबरपर्यंत मिळालेल्या अपडेट्सवर आधारित आहे.
फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांनी एका निवेदनात म्हटले की, उत्पादकता आणि कामकाजाच्या पद्धती सुधारण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून आम्ही जागतिक स्तरावर सुमारे ४ हजार कर्मचारी कमी करीत आहोत. ते पुढे म्हणाले की, हा एक कठीण, पण आवश्यक निर्णय आहे. कंपनीकडे या पर्यायाव्यतिरिक्त फारसे काही शिल्लक नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. फिलिप्सला फायदेशीर संस्थेत रूपांतरित करण्यासाठी आणि आमच्या सर्व भागधारकांसाठी ती एक मौल्यवान कंपनी बनवण्यासाठी अशा लवकर कृती (अॅक्शन) आवश्यक आहेत. गेल्या तिमाहीत फिलिप्सच्या कामगिरीवर ऑपरेशनल आणि पुरवठा आव्हानांमुळे गंभीर परिणाम झाला आहे, असे जेकब्स म्हणाले.