(नवी दिल्ली)
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर शिंदे-ठाकरे गटांकडून कागदपत्रांची लढाई सुरु झाली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे दोन ट्रक भरुन शपथपत्र दाखल केले आहेत.
खरी शिवसेना कोणाची? हा वाद अद्याप कायम आहे. सध्या उद्धव ठाकरे गटाला मिळालेले नाव आणि चिन्ह हे केवळ अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपुरते आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले. तर चिन्ह मशाल मिळाले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले असून ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्याने निडणूक आयोगाकडे कागदपत्रांची लढाई सुरु आहे. शिंदे गटाने देखील अडीच लाख शपथपत्र दाखल केलेले असून साडेसात लाख शपथपत्र दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
आज उद्धव ठाकरे गटाच्यावतीने दिल्लीत निवडणूक आयोगाकडे दोन ट्रक भरुन शपथपत्र दाखल केले आहेत. तब्बल साडेआठ लाख शपथपत्र असल्याचे ठाकरे गटाने सांगितले. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आपल्या बाजूने किती पदाधिकारी आहेत, याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता एवढी कागदपत्रे तपासून निर्णय द्यायला निवडणूक आयोगाला किती वेळ लागतो हे आता येणारा काळच ठरविणार आहे.