(संगलट-खेड / इक्बाल जमादार )
ग्रामीण भागाला दर्जेदार रस्त्यांनी जोडले जावे, दुरवस्था झालेल्या रस्त्याचे पुनरुज्जीवन करून सर्व खेडया-गावांना विकास गंगेशी जोडावे या उदात्त हेतूने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्राम डक योजनेवर शासन कोट्यावधी रुपये खर्ची घालते, मात्र दुर्गम भाग असलेली अनेक गावे अद्यापही पक्या रस्त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे ग्रामसडक योजनेचा पुरता फज्जा उडाल्याचे स्पष्ट होत आहे, शासनाच्या उदासीन धोरनेमुळे अनेक गावांचा खडतर प्रवास मात्र अद्यापही कायम आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे दापोली तालुक्यातील दाभीळ ते पन्हाळेकाजी रस्ता!
दापोली तालुक्यातील दाभीळ ते पन्हाळेकाजी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत तयार करण्यात आला आहे. रस्त्याला एक वर्ष देखील होत नाही; तोच रस्त्याची निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दुरावस्था झाल्याने शासनाची व नागरिकांची दिशाभूल झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत दाभीळ ते पन्हाळेकाजी हा 05 किमी अंतराचा लाखो रुपये खर्चाचा रस्ता सन 2019- 20 मध्ये बनविण्यात आला. परंतु एक वर्षही होत नाही; तोवर दाभीळ ते पन्हाळेकाजी गावापर्यंत अनेक ठिकाणी मोठ- मोठे खड्डे व जागोजागी रस्त्याला भेगापडून डांबर खडी निघण्याचा प्रकार सुरू झाला आहे.
गेली अनेक वर्षे या रस्त्याच्या दुरूस्ती साठी परिसरातील नागरिकांची धडपड चालू होती , सततचा पाठ पुरावा केला जात होता, लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी घेतल्या जात होत्या शेवटी नागरिकांच्या प्रयत्नांना यश येऊन सदरचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर झाला त्यामुळे एक दर्जेदार रस्ता मिळेल, या आशेने सदरच्या रस्त्यावर गेली चार वर्षे रूंदीकरण व BBM चे काम चालू असताना होणारा त्रास लोकं सहन करीत होते, परंतु गेल्या वर्षी मे महिना अखेरीस, पावसाळा सुरू होण्याअगोदर अंतिम टप्प्याचे 05 किमी.चे काम ठेकेदाराकडून फक्त 20 दिवसात अक्षरशः गुंडाळण्यात आले. परिणामी रस्त्याला भेगापडून अनेक ठिकाणी मोठ- मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे नागरिक चिडले असून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामावर लावण्यात आलेल्या फलकावरून हे काम झाल्यावर, रस्त्याची देखभाल व दुरुस्तीचे काम पाच वर्षांपर्यंत संबंधित ठेकेदाराचे असेल. पण फलक नावापुरतेच असल्याचे समोर आले आहे. फलकावर संबंधित ठेकेदाराकडून रस्ता देखभाल व दुरुस्ती तसेच इस्टिमेट देखील लावण्यात आले आहे. पण फलक लावले आहे व त्यानुसार कार्य करायचे आहे; हेच संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार विसरले की काय? असा प्रश्न नागरिक करीत आहे.
सदर रस्त्याची खातेनिहाय चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी तसेच सदर रस्त्यावर अंतिम सीलकोट परत करून द्यावे अशी मागणी नागरिकां कडून होत आहे.