( संगमेश्वर / प्रतिनिधी )
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने 6 जणांनी एकाला मारहाण केल्याची घटना 18 ऑक्टोबर रोजी संगमेश्वर येथे घडली होती. या मारहाण प्रकरणातील 6 जणांवर संगमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आज देवरूख न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने संशयिताना पोलिस कोठडी सुनावली आहे. एकाला १ दिवस तर अन्य ५ जणांना २ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
राज ठाकरेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने तरुणाला संगमेश्वर बाजारपेठेतील साई मेडिकलमध्ये घुसून शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात केली होती. विवेक नंदकुमार चव्हाण (शिवणे, तेर्ये, संगमेश्वर), जितेंद्र चव्हाण (कडवई), अनुराग कोचिरकर, शेखर नलावडे, सनी प्रसादे, सलमान अल्लीहुसेन बोदले (सर्व रा. देवरूख) अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना आज सायंकाळी देवरूख येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने विवेक चव्हाण याला १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्याने राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती.
दरम्यान इतर ५ जणांनी बेकायदेशीर जमाव करून दुकानात घुसून मारहाण केली व सार्वजनिक शांतता भंग करत मनाई आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.