(नाणीज)
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्मोत्सव उद्या (21 ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त अवघा सुंदरगड आजपासूनच गर्दीने फुलून गेला आहे. दुपारनंतर भर पावसात मिरवणुकांने सुंदर गडावरील देवदेवतांना निमंत्रणे देण्यात आली. उद्या तर सारे चैतन्यच येथे अवतरणार आहे. सोहळ्यासाठी सुंदरगडावर कालपासूनच भाविक येण्यास सुरूवात झाली आहे. मिळेल त्या वाहनांनी नाणीजला येऊन पावले सुंदरगड चढत आज दिवसभर सारे गुरूबंधू-भगिनी भेटीगाठीत रमले होते. आता सार्यांनाच उद्याच्या सोहळ्याची उत्सुकता आहे. त्यात सहभागी झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसतो आहे. उद्या गर्दी आणखी वाढणार आहे. सारा दिवस भरगच्च कार्यक्रमाने सजलेला असेल. त्यात प.पू. कानिफनाथ महाराज व जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांची प्रवचने तर आनंद सोहळा असणार आहेत.
उद्या 151 जणांचे एकाच वेळी, एकाच तालावर होणारे मदृंग वादन हे सोहळ्याचे आकर्षण असेल. या मंगलमय ध्वनीनंतर पारंपारिक पद्धतीने मुख्य सोहळा सुरू होईल. अंधार्या रात्रीत लाखो दीप उजळतील. जगद्गुरू श्रींचे ते औक्षण करतील. जयघोष, आरती, आतषबाजीने सारा सुंदरगड दुमदुमून जाईल. त्याचे साक्षिदार झाल्याने सारे स्वतःला भाग्यवंत समजतील. जे घरी आहेत ते मनोमन पूजा करून स्वामीजींचे आशीर्वाद घेतील. कारण हा उत्सवच प्रेरणादायी आहे.
या मंगलमय सोहळ्याची आज सुरूवात झाली. सकाळी अनेक धार्मिक विधी झाले. सोहळ्याची सुरूवात महा मृत्यूंजय सप्तचिरंजीव यागाने झाली. यावेळी अन्नदान विधी सुरु झाला. सकाळी 10 पासून जगद्गुरू नरेंद्राचायजी महाराज चरण दर्शन सोहळा झाला. त्याचवेळी रत्नागिरी जिल्हा सेवासमितीचे भजन झाले. दुपारनंतर देवदेवतांना भर पावसात मिरवणुकीने जाऊन सोहळ्याचे निमंत्रण दिले जाईल. प्रभू रामचंद्र मंदिर मिरवणुकीचे यजमानपद जालना जिल्हा सेवा समितीकडे होते. वरद चिंतामणी मंदिर मिरवणुकीचे यजमानपद नांदेड जिल्हा सेवा समितीकडे होते. नाथांचे माहेर मिरवणुकीचे यजमानपद लातूर जिल्हा सेवा समितीकडे होते. संतशिरोमणी गजानन महाराज मु‘य मंदिर मिरवणुकीचे यजमानपद संभाजीनगर जिल्हा सेवा समितीकडे होते. या सर्व मिरवणुकांत भाविकांचा उत्साह ओसंडून वहात होता.
हिरव्या साड्या परिधार केलेल्या व डोक्यावर कलश घेतलेल्या सुवासिनी, ध्वजधारी भगवी वस्त्रे परिधान केलेले पुरूष, भगव्या साड्या परिधान केलेल्या स्त्रिया या मिरवणुकीत मोठ्या सं‘येने सहभागी होते. वाद्यांचा गजर, त्याला टाळ-मृदंगाची साथ असा सारा उत्सवी सोहळा होता.
दरम्यान तरडगाव (ता. कर्जत, जि. अहमदनगर) व नाशिकहून निघालेल्या पायी दिंड्या आज नाणीजमध्ये दाखल झाल्या आहेत. उद्या सुंदरगडावर त्यांचे आगमन होईल. काल रात्रीपासून 24 तास महाप्रसाद सुरू झाला आहे. भाविक त्याचा रांगेने
आस्वाद घेत आहेत.
फोटो
श्री क्षेत्र नाणीजधाम येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात गुरूवारी झाली. त्यानिमित्त भर पावसात काढण्यात आलेल्या देवदेवतांना निमंत्रण देणार्या मिरवणुका.