(जाकादेवी/संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाचे गणित विषयाचे माजी शिक्षक तानाजी गणपती दुधाळे( वय-६८) यांचे कोल्हापूर येथे उपचारादरम्यान ( दि. १९) बुधवारी रात्री दुःखद निधन झाले.
तानाजी दुधाळे हे विद्यार्थी, पालक व समाजप्रिय शिक्षक होते. गणित विषयाचे ते उत्तम गणित शिक्षक म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला होता. सर्व स्तरातील लोकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. ते कोणाच्याही प्रसंगात धावत जाऊन ते खंबीरपणे आधार देत असत. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेकांना नि:स्वार्थीपणे मदत केली. सर्व स्तरात ते लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने कोणत्या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले पाहिजे, आवडीनुसार कोणते क्षेत्र निवडले पाहिजे, याबाबत ते सातत्याने विद्यार्थी व पालकांशी संपर्क ठेवून अनेकांना आपुलकीने मार्गदर्शन करत. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव हे त्यांचे मूळ गाव होय. नोकरीनिमित्त त्यांचा कोंकणातच रहिवास होता.मालगुंड शिक्षण संस्थेचे ते हितचिंतक होते.
दिवंगत तानाजी दुधाळे हे हरहुन्नरी व सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व होते.अनेकांच्या सुख-दुःखात ते सहभागी होत.आपल्या कुटुंबातील घटक या भावनेने ते अनेकांना आदर व आधार देत असत.
गुरूवारी पिंपळगाव येथील मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या अंत्ययात्रेत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत तानाजी दुधाळे यांना मालगुंड शिक्षण संस्थेच्या जाकादेवी, मालगुंड,काजुर्ली या माध्यमिक शाळांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दुसऱ्यांसाठी धडपडणारे दुधाळे सर अशा उत्स्फुर्त प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडून सहजपणे उमटल्या. त्यांच्या निधनाबद्दल मालगुंड शिक्षण संस्था, रत्नागिरी तालुका व जिल्ह्यासह , कोल्हापूर, मुंबईतून पालक, विद्यार्थी व मित्रमंडळ यांनी शोक व्यक्त केला.त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुलगे,सूना, नातवंडे,भाऊ, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे.