(रत्नागिरी)
गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात रंगला अनोखा ‘काव्यवाचन’ सोहळा भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून “अमृतधारा” या ७५ कवितांचा समावेश असलेल्या काव्यसंग्रहातील कवितांचा काव्यवाचन सोहळा महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील एक अग्रगण्य महाविद्यालय असून र. ए. सोसायटीचे संस्थापक कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी या ध्येयवेड्या दाम्पत्याने १९४५ मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची स्थापना केली. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यत शिक्षण, सांस्कृतिक कला, क्रीडा, संशोधन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्षभर ७५ विविध उपक्रमांचे करण्यात आले होते. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून डॉ. चित्रा गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली संपादक मंडळाने महाविद्यालयातील शिक्षक-विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी अशा चार भाषांत रचलेल्या ‘अमृतधारा’ या ७५ कवितांच्या पुस्तकांचे संपादन केले.
या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत, र. ए. सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. मुकुंदराव जोशी, कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजयराव साखळकर, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्वरचित कवितांचा काव्यवाचन सोहळ्याचे आयोजन महाविद्यालयात नुकतेच करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला शाखा उपप्राचार्या आणि संपादक डॉ. चित्रा गोस्वामी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात त्यांनी हे पुस्तक संपादित करण्यामागील पार्श्वभूमी, ते संपादित करण्यापासूनचा ते प्रकाशानापर्यंतचा झालेला प्रवास इ. चालेखाजोगा मांडून प्रभारी प्राचार्य, संपादक मंडळ, सहभागी कवींप्रति ऋण व्यक्त केले. यानंतर श्री. प्रसाद गवाणकर, डॉ. सीमा कदम, डॉ. निधी पटवर्धन, प्रा. कृष्णात खांडेकर, प्रा. सचिन सनगरे यांनी आणि प्रिया हळदणकर, प्रीती टिकेकर, सोहम राठोड, कौस्तूभ सरदेसाई, रुहिना राजवाडकर या विद्यार्थांनी आपल्या स्वरचित प्रकाशित कवितांचे
अभिवाचन केले.
याप्रसंगी संपादक मंडळातील प्रा. सीमा वीर, प्रा. वासुदेव आठल्ये यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी म्हणाले, कॉलेज ही एक रंगभूमी असून, आपण सर्व या रंगभूमीवरीकलाकार आहे. स्वरचित कविता करणे, ती मांडणे हा जीवनाला कलाटणी देणारा एक आगळावेगळा अनुभव असतो. गडबडीने काहीतरी लिहून ते कुठेतरी प्रकाशित करण्यापेक्षा थोडा विचारविनिमय लिहिले पाहिजे, आपलं म्हणणं नेमकेपणाने मांडणे महत्वाचे आहे. या काव्यसंग्रहात विविध शिक्षक-विद्यार्थी कवींनी मांडलेले अनुभव नवकवींसाठी खूपच प्रेरणादायी, प्रगल्भ करणारे आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थी नवकवींसाठी काव्यलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित प्राध्यापकांना केले.
प्रत्येकाने आयुष्यारुपी वाटेवर वाटचाल करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असे ते पुढे म्हणाले. यानंतर पुस्तकाचेमान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक-विद्यार्थांना सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कु. प्रिया हळदणकर, कु. प्रीती टिकेकर यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुलदत्त कुलकर्णी, कला, वाणिज्यआणि शास्त्र शाखेच्याउपप्राचार्या अनुक्रमे डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. यास्मिन आवटे, डॉ. अपर्णा कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. प्रसाद गवाणकर, शिक्षक आणि सेवक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.