(मुंबई)
रेल्वे बोर्डातील अधिकाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वे बोर्डाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आहेत,तर ओमराजे निंबाळकर या समितीचे सदस्य आहेत. या खासदारांच्या मागणीची दखल रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याने संतप्त झालेल्या या खासदारांनी आपले राजीनामे सादर केले आहेत.
कोरोना काळात बंद केलेले रेल्वे थांबे पूर्ववत सुरू करावेत व अन्य मागण्या रेल्वे बोर्डाकडे केल्या असता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्या धुडकावून लावल्या, रेल्वे अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराला कंटाळून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
रेल्वे समितीच्या बैठकीत आज रेल्वे प्रशासन आणि समिती सदस्य असलेल्या खासदारांमध्ये जोरदार घमासान झाले. त्यानंतर अध्यक्षांसह इतर खासदारांनीही आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा बोर्डाकडे सोपवला. रेल्वे विभागीय समितीचे अध्यक्ष खासदार रणजित निंबाळकर यांच्यासह सदस्य खासदारांनी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी समितीचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.