(मुंबई)
राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचा-यांना उत्सव अग्रीम देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचा-यांप्रमाणेच गट क व गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचा-यांनाही उत्सव अग्रीम मिळणार आहे. दिवाळीसाठी कर्मचा-यांना १२ हजार ५०० एवढी रक्कम अग्रीम म्हणून दिली जाणार आहे.
उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी १२ हजार ५०० एवढी रक्कम दिली जाणार असून १० समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता. अग्रीम घेणा-या कर्मचा-यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. राज्य सरकारकडून अराजपत्रित कर्मचा-यांना दिल्या जाणा-या अग्रीम रकमेचा वापर दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे होतो. परिणामत: अप्रत्यक्षरित्या शासनाला महसूल वाढ मिळते.