(मुंबई)
मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे मोठे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी आपल्या संपत्तीबद्दलचे गुपित सांगून टाकले. लोकं म्हणतात यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली, पण आम्ही दोन भावांनी खूप मेहनत घेतली. त्यांना सांगायचं आहे की, पहाटे ३ वाजल्यापासून आम्ही भाज्या विकायचो आणि ती भाजी माझगावच्या घरासमोरच्या फुटपाथवर विकायचो. हळूहळू भाज्या कंपन्यांना विकण्याचं कंत्राट घेतलं. आम्ही हळूहळू कंपन्या सुरू केल्या आणि त्यानंतर पैसा उभा राहिला, असे भुजबळ म्हणाले. या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, फारुख अब्दुला यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘माथाड्यांची कॉन्ट्रॅक्ट घेतली त्यात दोन पैसे मिळाले. एक कंपनी बंद पडली होती, तेव्हा कामगारांनी मलाच कंपनी चालवा आणि पगार द्या असं सांगितलं. अख्ख्या बीएसटीचे टायर माझ्याकडे रिमोल्डिंगला यायचे. रबरची दुसरी कंपनी पनवेलला घेतली. मुंबई-गोवा पहिली लक्झरी बस ‘भवानी ट्रॅव्हल्स’ छगन भुजबळने सुरू केली. सिनेमे काढले, असे अनेक उद्योग सुरू होते,’ असं भुजबळांनी सांगितले.
भुजबळ म्हणाले की, माझं नाव तेलगी मुद्रांक घोटाळ्यात घेतलं गेलं. मोका लावला त्यानंतर क्लीनचिट दिली, पण जे नुकसान व्हायचं ते झालं. उपमुख्यमंत्रीपद गेलं, मंत्रिपदही गेलं. मात्र पवार साहेबांनी संकट काळात मोठी मदत केली, असे भुजबळांनी म्हटले.