( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्याची अभिमानाने मान उंचावणारी कामगिरी राजापुरातील एका तरुणाने केली आहे. ३६ व्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत ३ सुवर्णपदक प्राप्त करुन या तरुणाने भारताचा झेंडा डौलाने उंचावला आहे. राजापूर तालुक्यातील तिवरे तरळवाडी येथील अक्षय तरळ याने ही सुवर्ण कामगिरी केली आहे.
अहमदाबाद येथे झालेल्या स्पर्धेत राजापुरातील तिवरे तरळवाडी येथील अक्षय तरळने देशासाठी मल्लखांब प्रकारातून खेळताना ३ सुवर्णपदक पटकावली आहे. अक्षय हा मूळचा राजापुरातील असला तरी सध्या तो कुटुंबासह मुंबई विलेपार्ले येथे राहतो. पार्लेश्वर व्यायामशाळेत गणेश देवरुखकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो. तो एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. नोकरी सांभाळून तो खेळाचा छंद जपत आहे. त्याने आजपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहे.
नुकत्याच अहमदाबाद येथे क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत पुरलेला मल्लखांब, टांगता मल्लखांब आणि दोरीचा मल्लखांब या तिन्ही प्रकारात त्याने आपली कसोटी पणाला लावून सुवर्ण कामगिरी केली. या तिन्ही प्रकारात त्याने 26.85 गुण मिळवले आणि महाराष्ट्रासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली.
सुवर्णपदक माझ्या करिअरसाठी उत्तम व्यासपीठ
या सुवर्णपदकाने मला आणखी मोठी संधी प्राप्त करुन दिली आहे. राष्ट्रीय स्तरावर यापूर्वी मी सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने आता यश हे सर्वोत्तम आहे, असे त्याने रत्नागिरी 24 न्यूज शी बोलताना सांगितले. तो पुढे बोलताना म्हणाला की, आजचे हे सुवर्णपदक म्हणजे माझ्या जीवनातील सुवर्ण कामगिरी आहे. अनेक वर्षे केलेल्या मेहनतीचे हे फळ मला पाप्त झाले आहे. हे सुवर्णपदक म्हणजे माझ्या भावी वाटचालीसाठी करिअरसाठी उत्तम व्यासपीठ आहे. माझ्या या यशात आई-वडिल, कुटुंब, नातेवाईक आणि ज्यांचे मार्गदर्शन लाभले असे माझे गुरुजन यांचा सिंहाचा वाटा आहे असे त्याने रत्नागिरी 24 न्यूजशी बोलताना सांगितले.