(मुंबई)
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा मुंबईत सक्रिय होत असल्याचे संकेत गुप्तचर यंत्रणांना मिळाले आहेत. त्यातच आता तो समुद्र मार्गे ८०० टन अंमली पदार्थ भारतात आणण्याच्या तयारीत असल्याचा सुगावा तपास यंत्रणांना मिळाल्याने सागरी तटरक्षक दल, नार्कोटिक्स विभाग आणि गुप्तचर यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळायला सुरवात केली आहे. गुजरात, मुंबईसह कोची बंदरातून ड्रग्जची तस्करी करताना अनेकांना अटक करण्यात आली आहे. अलीकडेच डीआरआयने नवी मुंबईच्या न्हावाशेवा बंदरात मालवाहतूक रोखून फळांच्या पेट्यांमध्यून होत असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीचा भांडोफोड केला होताा. डीआरआयने येथून ५०२ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते.
महत्वाची गोष्ट म्हणजे हे ड्रग्ज भारतातच बनत होते. ते बनवणा-याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अँटी नार्कोटिक सेल आणि भारतीय नौदलानेही दोन दिवसांपूर्वी कोची जवळ १२०० कोटी रूपयांचे २०० किलो हेरॉईन जप्त केले होते. या कारवाईत अटक चार आरोपी इरानचे आहेत. या प्रकरणाची चौकशी करणा-या यंत्रणांच्या मते गेल्या काही दिवसांपासून इरान, बलुचिस्तान (पाकिस्तान) आणि अफगाणिस्तानातून भारतात अंमली पदार्थ आणले जात आहेत. यासाठी वेगगेगळ्या बंदरांची मदत घेतली जात आहे.
ज्या प्रमाणात अंमली पदार्थ भारतात येत आहेत, त्याच प्रमाणे स्फोटके देखील आणली जाण्याची शक्यता असल्याने तपास यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. दाऊदचा नवा हस्तक हाजी सालेम बाबत तपास यंत्रणांनाही पुरेशी माहिती नाही. मात्र त्याचा एक फोटो तपास यंत्रणांना मिळाला आहे. अँटी नार्कोटिक सेल आणि भारतीय नौदलाने कोची जवळ समुद्रातून जप्त केलेल्या अंमली पदार्थांनंतरही हाजी सालेमचे नाव पुढे आले होते. त्यामुळे भारतात तब्बल ८०० टन ड्रग्ज आणण्याचा दाऊदचा प्लान असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.