(मुंबई)
गेल्या आठवड्यात खासगी ट्रॅव्हल्स आणि डंपर यांचा अपघात होऊन लागलेल्या भीषण आगीत १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली. या घटनेत ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या नियमांना तिलांजली देणाऱ्या खासगी ट्रॅव्हलची झाडाझडती घेण्यासाठी परिवहन विभागातर्फे विशेष तपासणी मोहीम २३ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. तसे आदेशच परिवहन आयुक्त कार्यालयाने काढले आहेत. याआधीही उन्हाळी सुट्टी आणि गणेशोत्सवात खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आली होती.
राज्यात फक्त एसटी महामंडळाला प्रवासी टप्पा वाहतुकीची परवानगी आहे. तरीदेखील खासगी ट्रॅव्हल्सने मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. या ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जातात. त्यामुळे अपघात होतात. अशा ट्रॅव्हल्सवर परिवहन विभागातर्फे वारंवार कारवाई करण्यात येते. या कारवाईत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरीत्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर नसणे, वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या केलेले फेरबदल, मोटर वाहन कर भरल्याची खात्री करणे, जादा भाडे आकारणे, अग्रिशमन यंत्रणा, आपत्कालिन निर्गमन दार आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत आहेत का याची तपासणी करणार आहेत.
ही तपासणी बस सुटण्याच्या ठिकाणी तसेच प्रमुख रस्त्यांवर करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील ५० प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून ही कारवाई केली जाणार आहे.
गणेशोत्सवातही खासगी ट्रॅव्हल्स विरोधात पंधरा दिवसांची विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी जादा भाडे घेणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक यासह अन्य वाहतूक नियमांचे पालन होते का याची तपासणी केली. योग्यता प्रमाणपत्र, रिफ्लेक्टर, राज्यात १० हजार बसची तपासणी करताना १९५ बस दोषी आढळल्या. त्यांच्याकडून फक्त ३६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. १६ ते २० मार्च २०२२ मध्येही विशेष कारवाई करताना ६ हजार ६१० बसच्या तपासणीत १०३ वाहतूकदारांकडून जादा भाडे घेणे, तर १ हजार ४१८ बस वाहतूकदारांना इतर गुन्ह्याबाबत २२ लाखांचा दंड आकारण्यात आला.