(मुंबई)
राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी शिक्षा भोगत असल्यामुळे न्यायालयाच्या निर्देशाची दखल घेऊन राज्य सरकार आता बारामती (पुणे), नारायणडोह (अहमदनगर), उमरोली (पालघर), हिंगोली, नांदेड, भुसावळ, अलिबाग आणि गोंदियामध्ये तुरुंग उभारण्यात येणार आहे. मुंबईत देवनारमध्येही नव्या तुरुंगाची शक्यता आहे. सध्या नारायणडोह आणि बारामतीमधील तुरुंगांचे काम सुरू झाले आहे. या आठ तुरुंगांसाठी सरकारने १० कोटी ५६ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
यापूर्वी तुरुंग उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जात असे. आता हे आठही तुरुंग महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत उभारले जाणार आहेत. राज्य सरकारने २०१८ मध्येच तुरुंग उभारणीसाठी आराखडा तयार केला आहे. विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आराखड्याला गती दिली आहे. सध्या या तुरुंगांना प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यतेची कार्यवाही सुरू आहे. राज्यात सध्या विविध प्रकारचे ६० तुरुंग आहेत. या सर्व तुरुंगांची कैदी क्षमता २४ हजार ७२२ आहे. पण त्यामध्ये ४२ हजार ८५९ कैदी आहेत. एकंदरीत क्षमतेपेक्षा ७३ टक्के कैदी अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. क्षमतेपेक्षा अधिक कैदी तुरुंगात असल्याच्या बाबतीत मुंबईतील आर्थर रोड तुरुंगाचा राज्यात पहिला क्रमांक आहे. या तुरुंगाची कैदी क्षमता ८०४ असताना सध्या तेथे ३ हजार ५०० कैदी आहेत. म्हणजेच क्षमतेच्या चारपट कैदी या तुरुंगात आहेत. या तुरुंगाच्या भोवती सध्या उंच इमारती उभ्या राहात असल्यामुळे तुरुंग आणि कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पाहून मुंबई उपनगरांत नवीन तुरुंग उभारण्याचा गृह विभाग विचार करत आहे.
या तुरुंगांसाठी १० एकर जमीन अपेक्षित आहे. सध्या देवनारनजीकच्या मंडला विभागात एकर उपलब्ध झाली आहे. ५ एकर जागेचा शोध सुरू आहे. महिला आणि बालकल्याण विभागाची तेथे जमीन पडून असल्यामुळे या विभागाशी गृह विभाग लवकरच चर्चा करणार असल्याची माहिती गृह विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सध्याच्या तुरुंगातील कैद्यांची वाढती संख्या विचारात घेऊन तेथे वाढीव नवीन बॅरेक्स बांधण्याचा विचार सुरू असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यात असलेली कारागृह प्रकार आणि संख्या
मध्यवर्ती कारागृह : ९
जिल्हा कारागृह : २८
विशेष कारागृह (रत्नागिरी) :१
किशोर सुधारालय, नाशिक : १
मुंबई जिल्हा महिला कारागृह : १
खुले कारागृह : १९
खुली वसाहत, आटपाडी : १
गुन्हा सिद्ध झालेले कैदी : ८ हजार ४४९
न्यायाधीन कैदी : ३४ हजार १८४
स्थानबद्ध व इतर : २२६
राज्यातील तुरुंगांची कैदी क्षमता २४ हजार ७२२
प्रत्यक्षात कैदी संख्या : ४२ हजार ८६९
पुरुष कैदी : ४१ हजार १२०
महिला कैदी : १ हजार ७३४
तृतीयपंथी : १५