(मुंबई)
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर त्याविरोधात उद्धव ठाकरे गटाने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह घाईगडबडीत गोठवण्यात आले आणि आपल्याला बाजू मांडण्याचीही संधी दिली गेली नाही, अशा आशयाची याचिका ठाकरे गटाच्या वतीने ॲड.विवेक सिंग, ॲड. देवयानी गुप्ता आणि अँड. तावी आनंद यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात दाखल केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग ठाकरे व शिंदे गटाला कोणते पक्षचिन्ह व नाव द्यायचे, याचा निर्णय वेगाने घेण्याची शक्यता असल्यामुळे आमच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली आहे. शिवसेनेने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही तीन चिन्हे निवडणूक आयोगाला सुचवली आहेत. दुसरीकडे, एकनाथ शिंदे गटानेही धनुष्यबाण चिन्हावर आपला दावा सांगितला आहे. याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हात्रे यांनी सांगितले की, धनुष्यबाण चिन्ह आमच्या गटाला मिळावे यासाठी आम्ही कायदे तज्ज्ञांकडून सल्ला घेत आहोत. यासंदर्भात पुढील व्यूहरचना ठरवण्यासाठी आमची बैठक झाली. तथापि, या विषयावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत.
नेमकी तक्रार कोणती?
केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने शिवसेनेचे नाव व चिन्ह गोठवले, त्या प्रक्रियेलाच ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत ठाकरे गटाने म्हटले आहे की, शिवसेना कुणाची, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर सुनावणी घेऊन आयोगाने दोन्ही गटांचे काय म्हणणे आहे. हे ऐकून घेणे अपेक्षित होते. मात्र, तसे काहीही न करता आम्हाला नैसर्गिक न्यायही नाकारण्यात आला, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. दरम्यान, निवडणूक आयोगापुढे दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील कामकाजाला स्थगिती दिली जावी आणि शिवसेनेशी संबंधित विषयांवर न्यायालयातच निवाडा व्हावा हा उद्धव ठाकरे गटाने केलेला विनंती अर्ज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने २७ सप्टेंबर रोजी फेटाळून लावला होता.