(मुंबई)
निवडणूक आयोगाचा “बाळासाहेबांची शिवसेना” या नावाबाबत निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत”, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने तीन दिवसापूर्वी शिवसेना पक्षाचे नाव व पक्षचिन्ह दोन्ही गोठवलं होते. त्यानंतर दोन्ही गटाला तीन नावे व तीन चिन्हे सुचवण्यास सांगितले होते. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वतीनं काल निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, आमच्या गटाला चिन्ह आज दिले जाईल. आम्ही दिलेली चिन्ह रद्द केली असली तरी आम्हाला आज नवीन चिन्ह मिळेल. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना म्हणून आम्ही भूमिका घेतली होती. आज निवडणूक आयोगाने आम्हाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ म्हणून पक्षाच्या नावाला मान्यता दिली आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, असं शिंदे म्हणाले.
शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. उगवता सूर्य तामिळनाडूतील एका पक्षाचे चिन्ह आहे तर त्रिशूळ व गदा हे धार्मिक चिन्ह असल्याने ही मागणी नाकारण्यात आली. शिंदे गटाला नवीन तीन चिन्हांचा पर्याय देण्यास सांगितले आहे.