देशी बुलेट ट्रेन वंदे भारतचा सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला आहे. गांधीनगर ते मुंबई दरम्यान ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावते. गुजरातमध्ये शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी या ट्रेनला जनावराने धडक दिली आहे. यामुळे ट्रेनच्या पुढच्या भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. गांधीनगरहून मुंबईकडे जाताना कंजारी आणि आणंद स्टेशनदरम्यान हा अपघात झाला. एक दिवस आधीट्रेन मणिनगर स्टेशनजवळ म्हैशींच्या कळपाला धडकली होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुजरात राज्यातील आणंद स्टेशन जवळ एक गाय ट्रेनला धडकली. त्यामुळे पुढच्या भागाचे किरकोळ नुकसान झाले. हा अपघात शुक्रवारी दुपारी ३ वाजून ४८ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून ४३२ किलोमीटर दूर आणंदमध्ये झाला. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी सांगितले की, ट्रेनच्या पुढच्या भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. यामध्ये प्रवाश्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
वंदे-भारत एक्सप्रेस ट्रेनला गुरुवारी सकाळी गुजरातमध्ये म्हैशींचा कळप धडकला होता. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)ने या म्हैशींच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पश्चिम रेल्वेकडून प्रसिद्ध निवेदनात म्हटले आहे की, म्हैशींचा कळप धडकल्याने गाडीला नुकसान झाले आहे. मात्र त्यावेळी गाडी दुरस्ती करून पुन्हा मार्गावर आणण्यात आली होती. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ प्रवक्ते (अहमदाबाद मंडळ) जितेंद्र कुमार जयंत यांनी सांगितले की, आरपीएफने अहमदाबादमध्ये वटवा आणि मणिनगर रेल्वे स्टेशनच्या दरम्यान वंदे भारत ट्रेनच्या मार्गात येणाऱ्या म्हैशींच्या मालिकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.