(नवी दिल्ली)
भारतीय बनावटीच्या कफ सिरपमुळे गॅम्बिया येथे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. मात्र हे कफ सिरप भारतीय कंपनी मेडेन फार्मा बनवत असली तरी त्याची विक्री भारतात होत नाही. मेडेन फार्माकडून या औषधाची गॅम्बियामध्ये निर्यात केली जाते, असं स्पष्टीकरण भारतीय औषध नियंत्रक मंडळाने दिलं आहे.
पश्चिम आफ्रिकन देशातील गॅम्बियामध्ये भारतीय औषध कंपनीने तयार केलेल्या सर्दी-खोकल्याचे सिरप प्यायल्याने 66 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या सिरपचा वापर न करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने तयार केलेल्या 4 कफ सिरपबाबत अलर्ट जारी केला आहे. सध्या डब्लूएचओकडून कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
मेडेन फार्मा या कंपनीचे मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. या चार प्रकारच्या सिरपची निर्मिती जरी भारतात होत असली तरी त्याची विक्री मात्र देशात केली जात नसल्याचं ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्टचे अध्यक्ष राजीव सिंघल यांनी म्हटलं आहे.