( नवी दिल्ली )
शिवसेनेत बंडाळी झाल्यापासून पक्षात उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदेना ४० आमदार व १२ खासदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे खरी शिवसेना व धुनष्यबाण ही निशाणीही आमचीच असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष महाराष्ट्रात उभा राहिला आहे. महाराष्ट्रातील हा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयातून निवडणूक आयोगाकडे हस्तांतरित झाला आहे. खरी शिवसेना कुणाची व धनुष्यबाण कोणाला द्यायचा याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे.
आजच्या शिवसेनच्या भूमिकेनंतरच निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यानुसार शिवसेनेचे काही निवडक पदाधिकारी सर्व कागदपत्रे घेऊन दिल्लीत दाखल झाले असून, आयोगापुढे बाजू मांडण्यात येणार आहे. कोणते मुद्दे मांडायचे, नेमकी भूमिका काय असावी यासाठी हे पदाधिकारी सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे समजते.
दोन्ही गटांकडून निवडणूक चिन्हावर दावा सांगितला जात असून यासाठी संघर्ष अधिक टोकाचा व गुंतागुंतीचा झाला आहे. त्यामुळे आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाऊ शकते असे बोलले जात आहे. धनुष्यबाण नेमका कुणाचा या वादात दोन्ही गटाला धक्का बसू शकतो. मात्र, धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिंदे गटापेक्षा उद्धव ठाकरे गटाला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर शिंदे गट ‘तलवार’ या चिन्हासाठी अर्ज करु शकतो. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे गटाकडून बीकेसीवर ५१ फूटी तलवारीचे पूजन करण्यात येणार असल्याने ‘तलवार’ या चिन्हासाठीचे संकेत मिळत आहेत.
आज दसऱ्याच्या निमित्तानं राज्यातील जनता महामुकाबला बघणार आहे, कारण शिवसेनेतल्या बंडानंतर पक्षातील दोन गटांचे दसरा मेळावे आज पार पडत आहेत. शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच होणाऱ्या दोन दसरा मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. दोन्ही बाजूंनी आरोपांच्या तोफा धडाडणार आहेत.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आजच्या मेळाव्याला येतील. आज मुंबईभर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राज्यभरातून शिवसैनिक वाहनांनी मुंबईत दाखल होणार असल्याने मंगळवारी तसेच बुधवारी मुंबई, ठाणे आदी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत पडलेली फूट आणि तोंडावर आलेली मुंबई महापालिका निवडणूक या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि भाजप हे दोन्ही ठाकरे यांच्या रडारवर आले आहेत. पक्षाचे निवडणूक चिन्ह ताब्यात ठेवण्यासाठी निकराची लढाई लढणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजचा दसरा मेळावा राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेचा व महत्वाचा आहे. मात्र, आज कोणाचे विचार शिवसैनिकांच्या काळजाचा ठाव घेणार यावर दोन्ही गटांच्या पुढील वाटचालीची दिशा ठरणार आहे.