जिल्ह्यात कुणबी समाजाची मजबूत ताकद असुनही गेल्या ३० वर्षात समाजाचा एकही आमदार झाला नाही. प्रस्थापीत राजकीय पक्षांनी समाजबांधवाना स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतेच मर्यादीत ठेवले. विविध राजकीय पक्षात समाज बांधव विखूरल्याने समाजाचे मोठे राजकीय नुकसान झाले. त्यामुळे प्रस्थापीत राजकीय पक्षांच्या कुबड्या न घेता आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय कुणबी सेनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला.
खेर्डी येथील माधवराव बाईत विद्यार्थी वसतिगृहात जिल्ह्यातील कुणबी सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाप्रमुख दादा बैकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला प्रामुख्याने चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वर तालुक्यातील कुणबी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्ताविकात सदस्य संजय जाबरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी आतापर्यंत ३०-३२ वर्षातील अनुभव सांगत विविध विषयांवर परखड मत मांडले. या बैठकीत कुणबी समाजाची सध्य स्थितीतील राजकीय परिस्थितीवर सखोल विचार विनिमय करण्यात आला. उपस्थितांनीही आक्रमक मते मांडली.
कोविड काळात आणि त्यानंतर चिपळूणातील महापूरामुळे संघटनेचे थांबलेले काम, त्यावर विचार मंथन होऊन कुणबी सेनेची पुन्हा नव्याने बांधणी करण्यात यावी, आक्रमक संघटन उभारून समाजिक प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी भूमिका मांडण्यात आली. कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोकणच्या नेतृत्वाची धुरा सुरेश भायजे यांच्याकडे सोपवण्यावर सर्वानी संमती दिली. बैठकीत प्रामुख्याने कुणबी समाजाची सध्य स्थितीतील राजकीय दशा आणि दिशा यावर चर्चा झाली. समाजाची सध्य स्थितीतील राजकीय परिस्थिती पाहता इतर राजकीय पक्षाच्या मागे न धावता आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे ठरले.
कुणबी समाजाला एकत्रितपणे, एकसंघ करून बहुजन समाजाला बरोबर घेत प्रस्थापित राजकीय पक्षांच्या कुबड्या न घेता लढण्याचे ठरवण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार कुणबी समाजाची मोठी ताकद आहे. त्यासाठी कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षांबरोबर न जाता कुणबी उमेदवार उभे करून निवडून आणायचे ठरले. बैठकीला बविआचे अध्यक्ष सुरेश भायजे, सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख दादा यांच्यासह माजी सभापती हरेकर यांनी मार्गदर्शन केले. दिलीप पेंढारी, प्रदिप उदेग, दीनानाथ रावणंग, गजानन वाघे, डी. के. बने, दत्ताराम लांबे, राजेंद्र धामणे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
जिल्ह्यातील सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच जे समाज बांधव ज्या ज्या पक्षात त्या त्या पदावर सक्रिय आहेत. त्यांना एकत्रित करण्यासाठी, त्यांची समाजाप्रती असलेली भावना, मानसिकता आणि राजकीय मते जाणून घेण्यासाठी १२ ऑक्टेंबरला खेर्डी येथेच वसतीगृहात बैठक घेण्याचे ठरले. या सभेला संबंधीतानी उपस्थित रहावे असे आवाहन सुरेश भायजे, दादा बैकर यांनी केले.