(नाणीज/वार्ताहर)
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पाली बसस्थानक व परिसरात शनिवारी सकाळी ८ पासून स्वच्छता मोहीम राबविली. या कार्यक्रमच्या मध्यामातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि त्याचे फायदे याबाबत जागृती करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत इयत्ता ९वी ते १२ वीपर्यंतच्या २०० विद्यार्थ्यांसह शिक्षकही या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण पाली बसस्थानक स्वच्छ करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तेथील प्लास्टिक उचलून परिसराची स्वच्छता केली. गवत काढले. सारा परिसर स्वच्छ केला. कचऱ्यासाठी नाणीजहून संस्थानचा ट्रॅक्टर आणला होता. मुलांनी गोळा केलेला सारा कचरा त्यात एकत्र करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
सुमारे तीन तासाहून अधिक वेळ विद्यार्थी आणि शिक्षक बसस्थानकाची स्वच्छता करत होते . स्वच्छतेनंतर सर्व विद्यार्थी शाळेच्या सभागृहात जमले आणि त्यांनी हात जोडून पुढे एक चांगले राष्ट्र घडवण्यासाठी काम करण्याचे शपथ घेऊन स्वच्छतेचा निर्धार पक्का केला. सर्व मुले आपल्या हातून एक चांगले समाजोपयोगी काम झाल्याच्या समाधानात होते. समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद प्रत्यक्ष कार्यातून विद्यार्थ्यांनी अनुभवले.
याप्रसंगी पालीचे सरपंच विठ्ठल सावंत, पालीचे चे स्थानक प्रमुख श्री सावंत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका गायत्री राठोड, शिक्षक विशाल माने, सूर्यदिप धनवडे, सूर्याजी होलमुखे, सुरज मांडेलकर, बाबुलाल सौदागर, लव सावंत,
त्रिशा सुवारे, अक्षया शिगम, आरती तरस, पुजा ताम्हणकर आदी उपस्थित होते. यावेळी सर्व नागरिकांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शाळेचे आभार मानले.