(मुंबई)
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अविनाश वाघमारे असे त्याचे नाव असून लोणावळा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या व्यक्तीने खोडसळपणे हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. हॉटेल मालकाशी पाण्याच्या बाटलीवरून वाद झाल्यानंतर त्याने ही खोटी माहिती दिली. लोणावळा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र शिंदे गटाने या बातमीचे भांडवल करून सुरक्षा यंत्रणेला कामाला लावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी तसेच वर्षा या शासकीय निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा कट रचला जातोय, अशी खोटी बतावणी अविनाश वाघमारे याने केली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अविनाश वाघमारे हा घाटकोपरला राहतो. एका हॉटेलमध्ये पाण्याची बॉटल घेण्यावरून त्याचा वाद झाला होता. बॉटलमागे पाच रुपये अधिकचे का घेतले जातात, असा जाब त्याने हॉटेल मालकाला विचारला. परवडत नसेल तर दुसरीकडे जा, असे प्रत्युत्तर हॉटेलवाल्याने त्याला दिले होते.
हॉटेल मालकाच्या या उत्तरामुळे अविनाश वाघमारे संतापला होता. मग त्याने हॉटेलमागे पोलिस ससेमिरा लावायचा विचार केला. यासाठी त्याने थेट शंभर नंबरवर कॉल केला आणि सदर हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याचा कट रचला जात आहे, अशी बतावणी केली. शनिवारी रात्री मुंबईवरून सांगलीला खाजगी बसने लोणावळ्यात जाताना हा प्रसंग घडला. त्यानंतर लोणावळा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.