(रत्नागिरी)
इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने रा. भा. शिर्के प्रशालेत आयोजित केलेल्या शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यासाठी सहजतेने गणित विषय व स्पर्धा परीक्षांसाठी तयारी, प्रशिक्षण कार्यशाळेला उदंड प्रतिसाद लाभला. यामध्ये प्रख्यात गणितज्ज्ञ महेंद्र करकरे यांनी मार्गदर्शन केले. यात इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी ३० पर्यंतचे पाढे दररोज म्हटले पाहिजे, वर्ग, घन यांचीही उजळणी व्हायला हवी. छोट्या छोट्या क्लृप्त्यांमधून आणि नियमांचे आकलन करून घेतल्यास गणित एकदम सोप्पे आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये ४५ सेकंदात प्रश्नाचे आकलन व गणिती प्रक्रिया पूर्ण करता आल्या पाहिजेत. याकरिता सरावाची आवश्यकता आहे. दोन आकडी ते पाच-सहा आकडी गणिती प्रक्रिया करताना गोंधळून न जाता एकेक पायऱ्या चढल्या पाहिजेत, अशा शब्दांत प्रख्यात गणितज्ज्ञ महेंद्र करकरे यांनी मार्गदर्शन केले.
सुरवातीला मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केला. या वेळी प्रभारी मुख्याध्यापक आर. बी. चव्हाण उपस्थित होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन म्हणाल्या की, गणित समजलं त्याला जगातलं सगळं ज्ञान समजलं. आपले शिक्षण असे आहे की विज्ञानवाल्यांना वाणिज्य शिकवले जात नाही, जे करतात त्यांना हिशोब माहिती आहेत, त्यांना वस्तू बनवता येत नाहीत. बेरीज, वजाबाकी याचे नीट ज्ञान हवे असेल तर हिशोब पक्का हवा. आर्यभट्ट, रामानुजम महान गणिती होऊन गेले. सतत मेहनत, जिज्ञासा हवी. एकाच वर्गातील एका विद्यार्थ्यांला १०० गुण, दुसऱ्या ३५ गुण मिळतात, एखादा नापास होतो. शिकवणारा शिक्षक एकच असतो. त्यामुळे समजून घेतो किती व कृती किती हे कळले पाहिजे. आजच्या कार्यक्रमातून रामानुजम, शकुंतला देवी तयार व्हावी. डॉ. ठाकूर यांनी देशभरात हॉस्पीटल्स उभारणी केली आहेत, ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. अशाच प्रकारे विद्यार्थ्यांनी मातृ ऋण, पितृ ऋण आणि समाज ऋण आपल्या परीने फेडायचे आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार सुकांत चक्रदेव यांनी केले.